प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) संपूर्ण तालुक्यात एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
तालुक्यात चापगाव ग्रा. पं. च्या वॉर्ड नं. 1 मधून माजी चेअरमन रमेश धबाले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तालुक्यात उमेदवारी अर्ज भरणाऱयांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे घेण्यासाठी खानापूर शहरातील बाँड राईटर, नोटरी, वकील तसेच सायबर कॅफेमध्ये इच्छुकांची एकच गर्दी झाली होती. तर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. अशा गावांनी बैठका घेऊन एकमताने उमेदवारी निश्चित केले आहेत. त्यामध्ये नागुर्डा ग्रा. पं. मधील मोदेकोप्प व कान्सुली गावानी आपले उमेदवार एकमताने निश्चित केले आहेत. तर पारवाड ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील चिखले गावकऱयांनीही बिनविरोध उमेदवार निश्चित केले आहेत.