प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात भाजपा क्रमांक दोनचा पक्ष आहे. याच पक्षाची आगामी जिल्हा बँक, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभावीपणे भाजपा उतरण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कानमंत्र द्यायला दि. 9 रोजी येणार आहेत. ते नेमके कोणाला कानमंत्र देणार की कोणाची खरडपट्टी काढणार हे उद्याच समजणार आहे. दरम्यान, सातारा नगरपालिकेच्या एका नगरसेविकेच्या अनेक उचापतीच्या तक्रारी वाढल्या असून त्याबाबतही काही तक्रारी थेट वरिष्ठांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे शहरातील भाजपाची निंदानालस्ती सुरु आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्यात भाजपाने आपली मोट बांधली असल्याने दुसऱया क्रमांकावरचा पक्ष बनला आहे. जिह्यात भाजपाचे दोन खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, नगरसेवक आहेत. भाजपा पक्ष राज्यात सत्तेत नसल्याने थोडीसी भाजपाला मरगळ आलेली आहे. जे कार्यकर्ते पदाधिकारी उत्साहाने काम करत होते ते काम करताना दिसत नाहीत. मात्र, काहींच्या उचापती सतत सुरु असतात. त्यामध्ये सातारा पालिकेतील एका नगरसेविकेच्या अनेक तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे त्यावर चंद्रकांत पाटील हे नेमकी काय कानटोचणी करणार?, तसेच येवू घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकीमध्ये भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांच्या हातात जिल्हा बँकेच्या निवडणूकीमध्ये भाजपाची पक्षीय लढवायची की राष्ट्रवादीच्या सोबत राहून लढवायची आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे उद्या साताऱयाच्या दौऱयावर असून दुपारी 2 ते 9 अशा आढावा बैठका घेणार आहेत. या बैठका गोपनिय अशा होणार आहेत.