सेन्सेक्स 202 अंकांनी घसरला ः वाढत्या कोरोना संसर्गाची गुंतवणूकदारांना चिंता
वृत्तसंस्था / मुंबई
देशातील दिवसाणिक वाढत जाणाऱया कोरोना संसर्गाच्या थैमानामुळे भारतीय भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे ढग निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. चालू आठवडय़ात सेन्सेक्स आणि निफ्टी यांचा प्रवास मोठय़ा दबावात राहिल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये सध्याच्या आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स जवळपास 202 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
कोरोना संसर्गाचा दुसऱया लाटेतील फैलाव हा अर्थव्यवस्थेची चिंता वाढविणारी आहे. याचदरम्यान शुक्रवारी प्रमुख कंपन्यांपैकी आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांमधील कामगिरीच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 202.22 अंकांसह 0.42 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 47,878.45 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 64.80 अंकासोबत 0.45 टक्क्यांसह निर्देशांक 14,341.35 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील समभागांमध्ये सर्वाधिक नुकसानीत महिंद्रा ऍण्ड महिंद्रा दोन टक्क्यांनी घसरणीत राहिले आहेत. यासह डॉ. रेड्डीज लॅब, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक, एचडीएफसी आणि एशियन पेन्ट्स आदी समभाग मात्र तेजीत राहिल्याची नोंद केली आहे.
प्रमुख घडामोडींचा प्रभाव
शेअर बाजारात चढउताराचा प्रवास राहण्यासोबत सार्वजनिक क्षेत्रातील बँका वगळता अन्य क्षेत्रात विक्रीचा दबाव राहिल्याने भारतीय शेअर बाजार अंतिम दिवशी घसरणीसह बंद झाला आहे. यामुळे पुढील आठवडय़ामध्ये सेन्सेक्स व निफ्टीचा प्रवास कसा काय असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे अभ्यासकांनी संकेत व्यक्त केले आहेत.