पहिल्याच दिवशी दहा रूग्ण दाखल
प्रतिनिधी / वास्को
चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये काल सोमवारपासून कोरोना रूग्णांना दाखल करण्यास सुरवात करण्यात आली आहे. गोमेकॉ, दक्षिण गोवा जिल्हा जिल्हा हॉस्पिटल, ईएसआय हॉस्पिटल या हॉस्पिटलसह आता चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्येही कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. काल पहिल्याच दिवशी या हॉस्पिटलमध्ये 10 रूग्णांना दाखल करून घेण्यात आले.
वास्को चिखली येथील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये केवळ लसीकरण आणि कोविड चाचणी करण्यात येत होती. सर्वसामान्य रूग्ण तसेच कोविड लसीकरण आणि चाचणीसाठी येणाऱया लोकांमुळे या हॉस्पिटलमध्ये दरदिवशी शेकडो लोकांची गर्दी पडत होती. या वातावरणात दरदिवशी जवळपास दिडशे केरोना बाधीत म्हणून आढळून येत होते. या बाधीतांपैकी लक्षणे नसलेल्यांना किंवा सौम्य लक्षणे दिसत असलेल्यांना घरीच कॉरंन्टाईन राहण्याचा सल्ला देण्यात येत होता तर गंभीर लक्षणे असलेल्यांना मडगावच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये किंवा इएसआय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत होते. आता मुरगाव तालुक्यातील ज्यांना हॉस्पिटलमधील उपचारांची आवश्यकता भासेल त्या रूग्णांना चिखलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्या उपचार करण्यात येतील. शुक्रवारी यासंबंधी निर्णय झाला होता. काल सोमवारपासून या हॉस्पिटलमध्ये रूग्णांना दाखल करून घेण्यास सुरवात झाली. पहिल्याच दिवशी 10 रूग्णांना दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
कोविडसाठी प्रारंभी 30 खाटांचा वापर, सर्वसामान्य रूग्णांवर दुसऱया हॉस्पिटलमध्ये उपचार
यासंबंधी उपजिल्हा हॉस्पिटलचे प्रमुख आरोग्याधिकारी डॉ. अनिल हुम्रसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमधील वापरात असलेल्या 60 खाटांपैकी 30 खाटांचा उपयोग सध्या कोविड उपचारांसाठी करण्यास सुरवात करण्यात आलेली आहे. पहिल्याच दिवशी 10 रूग्णांना दाखल करून घेण्यात आलेले आहेत. या हॉस्पिटलमध्ये केवळ सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांनाच दाखल करून घेण्यात येणार असून त्यांच्यासाठी ऑक्सिजन व इतर आवश्यक सज्जता ठेवण्यात आलेली आहे. चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलचा कोविड हॉस्पिटल म्हणून वापर करण्यात येत असला तरी बाहय़ रूग्ण विभागात येणाऱया सर्वसामान्य रूग्णांवरही उपचार करण्यात येतील. मात्र, त्यांना या हॉस्पिटलमध्य दाखल करून घेण्यात येणार नाही. त्यांना गोमेकॉ, हॉस्पिसियो अशा ठिकाणी दाखल होण्यासाठी पाठवण्यात येईल. कोविड हॉस्पिटलमध्ये इतर आजार असलेल्या रूग्णांना धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे इतर रूग्णांना सध्या या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात येणार असल्याचे डॉ. हुम्रसकर यांनी सांगितले.
लसीकरणाची प्रक्रिया आता रवींद्र भवनमध्येच
दरम्यान, चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये होणारे लसीकरण आता बायणातील रवींद्र भवनात हलवण्यात आले आहे. रवींद्र भवनात दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या लसीकरणाच्या व्यवस्थेची आमदार कार्लुस आल्मेदा, नगरसेवक अमेय चोपडेकर व भाजपाच्या पदाधिकाऱयांनी सोमवारी पाहणी केली. यावेळी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सरकार आपल्यापरीने सर्वांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेत असून जनतेनेही जागृत राहून स्वताची काळजी घ्यायला हवी अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.
लॉकडाऊन उठला तरी वास्कोत वर्दळ कमी, काही व्यवहार बंदच
दरम्यान, काल सोमवारी वास्को शहरात लॉकडाऊननंतरच्या व्यवहारांना सुरवात झाली. वास्को शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झालेले आहेत. मात्र, बाजारात लोकांची वर्दळ कमी झाली आहे. शहरातील बरीच दुकाने काल सोमवारीही बंदच होती. काहींनी स्वताहून आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. प्रवासी बस वाहतुकीवर सध्या परीणाम झालेला आहे. कोरोनाच्या भितीने प्रवासी मिळत नसल्याने अद्याप सर्व प्रवासी बसगाडय़ा रस्त्यावर उतरलेल्या नाहीत. वास्कोतील हॉटेल्स उघडी होती. परंतु ग्राहकांची वर्दळ नव्हती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वास्कोतील सर्व व्यापाऱयांनी स्वखुषीने काही दिवस लॉकडाऊन पाळावा असा सूर वास्कोतील जबाबदार व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.
कुठ्ठाळी व वेर्णा पंचायत क्षेत्रात बंदचे आवाहन
मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी पंचायतीने आपल्या क्षेत्रातील व्यापाऱयांवर कडक निर्बंध आणले आहेत. पंचायतीने काल सोमवार आदेश जारी केलेला असून या आदेशानुसार जीवनावश्यक नसलेली व्यापारी सेवा येत्या दि. 9 पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन पंचायतीने केले आहे. गोव्याबरोबरच कुठ्ठाळीतही कोरोनाचा प्रसार घातक प्रमाणात होत असून हा प्रसार रोखण्यासाठी व्यापाऱयांनी आपले व्यवहार बंद ठेवावेत. हॉटेल्स व्यवसायीकांनी पार्सल सेवा तेवढी पुरवावी असे आवाहन सरपंच सानिया परेरा यांनी केले आहे.
वेर्णा पंचायतीने वाढत्या कोरोना प्रसाराची गंभीर दखल घेऊन स्वताहून आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. वेर्णा पंचायतीच्या सरपंच मारी फर्नांडिस यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार आज मंगळवारपासून आठ दिवस पंचायत कार्यालय बंद ठेवण्यात येणार असून पंचायत क्षेत्रातील सर्व व्यापाऱयांनी बंद पाळून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, पंचायत क्षेत्रातील किराणा व इतर दुकाने सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा राहणार असल्याचे संपंच्यानी म्हटले आहे.