अतिकमजोर असल्याचा आरोप, युद्धाच्या धोक्याचा कांगावा, अमेरिका-चीन मतभेद विकोपाला जाण्याची शक्यता
वृत्तसंस्था / बिजींग
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जोसेफ तथा ज्यो बायडन हे कमजोर अध्यक्ष आहेत, अशी चिथावणीखोर टीका चीनने केली आहे. बायडन यांच्या काळात चीनशी अमेरिकेचे युद्धही संभवते, अशी शक्यता व्यक्त करत चीनने आपले अमेरिकासंबंधातील धोरण काय असेल याचे संकेत दिले आहेत.
चीनच्या सरकारचे सल्लागार आणि इन्स्टिटय़ूट ऑफ ग्लोबल अँड कटेंपोररी चायना’ या संस्थेचे प्रमुख झेंग योंगनियान यांनी आपल्या सरकारला अमेरिकेपासून सावध राहण्याचा इशारा दिला. बायडन हे दुर्बळ अध्यक्ष आहेत. त्यांची अमेरिकेच्या देशांतर्गत समस्या सोडविण्याची क्षमता नाही. त्यामुळे ते या समस्यांवरून अन्यत्र लक्ष वेधण्यासाठी चीनविरोधात आक्रमक धोरण स्वीकारू शकतात. तसेच चीनशी युद्ध होईल अशी परिस्थितीही निर्माण करू शकतात. त्यामुळे चीनने बायडन यांच्याकडून आपला लाभ होईल अशी स्वप्ने पाहू नयेत. उलट सावध भूमिका घ्यावी, असा सल्ला योंगनियांग यांनी दिला आहे.
चीनचे सर्वेसर्वा क्षी जिनपिंग यांनी ऑगस्टमध्ये एका परिषदेचे आयोजन पेले होते. या परिषदेचे आमंत्रण योंगनियांग यांनाही होते. त्यांच्यावर चीनने देशाचे दीर्घकालीन परराष्ट्र धोरण काय असावे यासंबंधी सल्ला देण्याचे उत्तरदायित्व सोपविले होते. त्यानुसार त्यांनी वेळोवेळी चीनी प्रशासनाला सल्ला दिला आहे.
कोरोनाशी संबंधित
कोरोनाचा जगभर, विशेषतः अमेरिकेत प्रसार चीनमुळेच झाला, अशी अमेरिकेतल्या जनतेची समजूत आहे. त्यामुळे त्या देशात चीनविरोधी भावना प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याचा प्रभाव बायडन यांच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. शिवाय अमेरिकन समाज दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. या सामाजिक फुटीवर बायडन यांच्याकडे कोणताही उपाय नाही. त्यामुळे ते चीनविरोधात भूमिका घेऊन आपली लोकप्रियता टिकविण्याचा प्रयत्न करतील हे निश्चित आहे. ते चीनच्या आंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करतील, असाही आरोप योंगनियांग करतात.
चीनविरोधात एकमत
चीनच्या प्रगतीला विरोध केला पाहिजे यावर अमेरिकेतील देन्ही प्रमुख पक्षांचे एकमत आहे. अमेरिकेच्या वरीष्ठ सभागृहात (सिनेट) चीनविरोधात असंख्य प्रस्ताव मांडण्यात आले असून ते चीनच्या नाकात वेसण घालण्यासाठी आहेत. डेमॉक्रेटिक व रिपब्लिकन या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी ते विचारार्थ घेतले आहेत. त्यामुळे सत्ता कोणाचीही असली तरी अमेरिकेचे धोरण चीनविरोधीच राहणार हे निश्चित समजून प्रशासनाने देशाच्या सुरक्षेची सज्जता करणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी दिला.
रशियाचा नकार
बायडन यांना अमेरिकेचे अध्यक्ष मानण्यास रशियाने नकार दिला आहे. बायडन यांच्या अध्यक्षपदी निवडीसंबंधी अनेक संशय आहेत. निवडणूक प्रक्रियाही संशयाच्या घेऱयात आहे. त्यामुळे बायडन यांना अध्यक्ष मानण्यास रशियाची तयारी नाही, असे त्या देशाच्या काही सरकारी सल्लागारांनी प्रतिपादन केले आहे. त्यामुळे पुन्हा जग शीतयुद्धाकडे जाणार का असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
निवडणूक प्रचारातही संकेत
बायडन हे चीनसंबंधी मवाळ धोरण स्वीकारणार नाहीत, याचे संकेत त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. हाँगकाँग, तिबेट आणि झिनझियांग या प्रांतांमध्ये चीनने दडपशाही चालविली आहे. चीनला जाब विचारला जाईल, असे बायडन यांनी अप्रत्यक्षरित्या सुचविले होते. त्यावरही योंगनियांग यांनी टिप्पणी केली असून अमेरिकेवर विश्वासास पात्र नसल्याचा आरोप केला.
अमेरिका-चीन जुंपणार ?
- बायडन यांच्या शपथविधीपूर्वीच चीनचे शरसंधान
- अमेरिका-चीन संबंध आणखी बिघडण्याचे संकेत
- अमेरिकेवर आंतर्गत व्यवहारात हस्तक्षेपाचा आरोप
- चीनपाठोपाठ रशियाचाही अमेरिकेवर संशय व्यक्त