प्रतिनिधी/ पणजी
गुरुवारी कोरोनामुळे 12 जणांचे बळी गेले असून 524 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. 400 जणांची कोरोनातून सुटका झाली आहे. एकूण बळी 440 वर पोहोचले असून सध्या 4977 एवढे सक्रिय रुग्ण विविध इस्पितळात व कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंतचे एकूण रुग्ण 33942 एवढे झाले असून त्यातील 28525 जण बरे झाले आहेत.
आरोग्य खात्याने सदर माहिती दिली आहे. कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून 71 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 303 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. गुरुवारी 2096 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 524 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विविध मार्गाने गोव्यात आलेल्या 3 प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे – डिचोली 189, सांखळी 298, पेडणे 167, वाळपई 151, म्हापसा 261, पणजी 281, हळदोणा 115, बेतकी 102, कांदोळी 151, कासारवर्णे 57, कोलवाळ 84, खोर्ली 204, चिंबल 191, शिवोली 213, पर्वरी 315, मये 52, कुडचडे 89, काणकोण 136, मडगाव 352, वास्को 289, बाळ्ळी 63, कासावली 119, चिंचिणी 62, कुठ्ठाळी 228, कुडतरी 69, लोटली 78, मडकई 58, केपे 70, सांगे 103, शिरोडा 36, धारबांदोडा 98, फोंडा 211, नावेली 82.
महापौर उदय मडकईकर कोरोनाबाधित
पणजीचे महापौर उदय मडकईकर हे कोरोनाबाधित झाले असून त्यांनी होम आयसोलेशन स्वीकारले आहे. पणजी शहरात गुरुवारी 27 नवीन कोरोनाबाधित सापडले असून बहुतेकांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आहे. काहीजण बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम कोविड सेंटरात दाखल झाले आहेत. त्यात 10 वर्षाचा मुलगा, 14 वर्षाची मुलगी तसेच तरुण तरुणींचा व मध्यमवयीन महिला, पुरुषांचा समावेश आहे. मळा, करजांळे, मिरामार, सांत ईनेज, भाटले या भागात हे नवीन कोरोना रुग्ण मिळाले आहेत.