वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स
बेलारूसची द्वितीय मानांकित महिला टेनिसपटू आर्यना साबालेन्का हिला कोरोनाची बाधा झाली असून तिने आगामी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.
गेल्या सामन्यात झालेल्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत साबालेन्काला उपांत्य फेरीत कॅनडाच्या नवोदित फर्नांडिजकडून पराभव पत्करावा लागला होता. साबालेन्काची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यावेळी तिला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. साबालेन्काला काही दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. कोरोनाची लागण झाल्याने 4 ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणाऱया इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत ती उपलब्ध होवू शकणार नाही. दरम्यान वर्षअखेरीस होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील अंतिम स्पर्धेसाठी साबालेन्का यापूर्वीच पात्र ठरली आहे.