वार्ताहर/ कुडाळ
‘हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात जपानमध्ये शिवभक्तांनी शिवजयंतीचे आयोजन केले होते. शिवाजी महाराजांचे पोवाडे लावत शिवभक्तांनी शिवाजी महाराज की जय म्हणत सातारा, सांगली, कोल्हापूरमधील युवकांनी जपानमध्ये मोठय़ा उत्साहात शिवजयंती साजरी केली. महाराष्ट्रासह सगळ्या भारतभर शिवजयंतीचा महोत्सव साजरा होत असताना तिकडे जपानमध्ये सुद्धा शिवजन्मोत्सवाचा एक ऐतिहासिक सोहळा पार पडला आहे. भारत-जपानच्या 70 वर्षांच्या संबंधामध्ये पहिल्यांदाच जपानमध्ये शिवजयंती साजरी होत आहे.
भारत कल्चरल सोसायटी जपान या जपानमधील संस्थेने यावर्षीपासून दरवर्षी जपानमध्ये शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प केला आहे. भारतीय मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणे, त्यावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करणे आणि सार्वजनिक शिवजयंती साजरी करणे असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठी प्रथमच शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा जपानमध्ये पोचला आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने टोकियोमधील राधागोविंद मंदिरामध्ये त्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक आणि रितसर पद्धतीने विधिवत पूजा करून शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे शिवभक्त संदीप गुंडप, अमोल शेलार, नवनीत सिसोदिया, नागभूषण वैद्य, रोहन अग्रवाल, मुकेश गुप्ता, विकास रंजन, महेश पिंपरीकर, निखिल मयेकर, राजेश आवाके, प्रदीप शरण, विशाल देशपांडे, कुशेन्द्र चौधरी, ओमसाई गुप्ता इ. सदस्य उपस्थित होते. अभिषेक आणि पूजेचा विधी विकास काळे यांनी पार पाडला.
शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटात सुमारे 215 स्पर्धकांनी भाग घेतला. शिवाजी महाराजांना मराठी माणसापुरते मर्यादित न ठेवता सर्व भाषिकांसह देशवासीयांना त्यांचा इतिहास माहिती व्हावा व शिवाजी महाराज फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण देशाला शिवाजी महाराजांचे महत्त्व आणि पराक्रम कळावेत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असून.
कोरोना परिस्थिती अजून नियंत्रणात नसल्यामुळे जरी हा कार्यक्रम थोडक्यात झाला असला तरी 21-मार्चला, ज्यादिवशी तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यादिवशी टोकियोमध्ये शिवजयंतीचा सार्वजनिक कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. बाल शिवाजीचा पाळणा, पोवाडे, लेझीम, शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक अशा पारंपरिक प्रस्तुतीसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
भारत कल्चरल सोसायटी जपान या संस्थेने जपानमधील भारतीय दूतावास, हिंदू स्वयंसेवक संघ, टोकियो मराठी मंडळ, शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती अमोल शेलार यांनी दिली आहे.