ऑनलाईन टीम / जम्मू :
काश्मिरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका भाजप नेत्याची गोळी मारून हत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. हत्या झालेल्या नेत्याचे जावेद अहमद डार असे नाव आहे. जावेद हे होमशालिबुग विधासभा क्षेत्रामध्ये पार्टीचे प्रभारी म्हणून काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जावेद यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार होण्यापूर्वीच, त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा भाजपने निषेध केला आहे.
जम्मू काश्मिरचे भाजप प्रवक्ते अल्फात ठाकुर यांनी जावेद यांच्या हत्येबाबत दुःख व्यक्त केले आहे. दहशतवादी निरपराध लोकांना लक्ष्य करत आहेत. हे भ्याड कृत्य असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी ठाकूर यांनी पोलिसांना मारेकऱयांना पकडण्याची आणि कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, जावेद अहमदला कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी ठार केले, मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. जावेदच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱयांना माझी संवेदना.