अमेरिकेच्या अध्यक्षांकडून मोदींसह 40 जागतिक नेत्यांना निमंत्रण
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
पुढील महिन्यात होणाऱया हवामान संकटासंबंधीच्या जागतिक हवामान परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत जगातील 40 बडय़ा नेत्यांना निमंत्रित केले आहे. या नेत्यांमध्ये चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचेही नाव सामील आहे. या परिषदेचे निमंत्रण भूतान आणि बांगलादेशला मिळाले असले तरीही पाकिस्तानला यातून वगळण्यात आले आहे.
सद्यकाळात कोरोनासह जागतिक स्तरावर हवामान बदलही चिंतेचा विषय ठरला आह. यावर चर्चेसाठी बायडेन यांच्याकडून जागतिक हवामान परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. परिषद 22 आणि 23 एप्रिल रोजी ऑनलाईन होणार असून लोकांसाठी थेट प्रसारण करण्यात येणार आहे. ग्लासगोमध्ये नोव्हेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघ हवामान बदल कॉन्फरन्सच्या दिशेने (सीओपी26) हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे व्हाइट हाउसकडून म्हटले गेले आहे.
परिषदेत जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन समवेत अनेक युरोपीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सौदी अरेबियाचे राजे सलमान-बिन-अब्दुलाजीज, ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान देखील यात सहभागी होणार आहेत.
नागरी समुदायाचे नेतेही सामील
आपला देश कशाप्रकारे जगाच्या मजबूत हवामान महत्त्वाकांक्षेत योगदान देऊ शकतो या दृष्टीकोनातून या परिषदेकडे संधी म्हणून पाहण्यात यावे. मजबूत हवामान नेतृत्व दाखवून देणाऱया अन्य देशांच्या प्रमुखांनाही बायडेन यांनी निमंत्रित केले आहे. परिषदेत मोठय़ा संख्येत उद्योग आणि नागरी समुदायाचे नेतेही सामील होणार असल्याचे व्हाइट हाउसने म्हटले आहे.
प्रदूषणाला बसणार आळा
बायडेन प्रशासन क्लायमेट ऑन लीडर्स परिषदेसाठी पूर्णपणे तयार आहे. या परिषदेत हवामान बदल विचारात घेत अनेक मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. या परिषदेदरम्यान अमेरिका जीवाश्म इंधनाने होणाऱया प्रदूषणाला कमी करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलणार असल्याचे समजते. परिषदेत हवामान बदलाच्या प्रभावांपासून जीवन आणि उपजीविकेचे रक्षण करण्याची क्षमता मजबूत करण्याच्या संधींवर चर्चा होणार आहे. याचबरोबर हवामान बदलामुळे निर्माण सुरक्षा आव्हाने आणि तत्परतेवरील प्रभावावरही चर्चा केली जाईल.