मृत महिलेवर उपचार प्रकरण
प्रतिनिधी / इस्लामपूर
येथील आधार हेल्थकेअरचा डॉ. योगेश वाठारकर याने जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या बुधवार दि.१४ रोजी जिल्हा न्यायाधीश क्र-२ राजश्री परदेशी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
सायरा शेख (६०रा.कासेगाव) या उपचारासाठी डॉ. वाठारकर याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. त्यांचा दि.८ मार्च रोजी मृत्यू झाला. पण मृत झालेल्या या महिलेवर पुढे दोन दिवस उपचार सुरु ठेवून, बनावट कागदपत्रे बनवून जादा बिल आकरल्या प्रकरणी डॉ. वाठारकर याच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अटक, पाच दिवस पोलीस कोठडी नंतर सोमवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
त्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जामीनासाठी अर्ज केला. पण हा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी डॉ.वाठारकर याने जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख व सहा. जिल्हा सरकारी वकील रणजीत पाटील हे युक्तिवाद करतील. या सुनावणीकडे शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.