प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची औरंगाबाद येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी बदली करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. श्रीमंत चव्हाण यांची पदोन्नतीने जिल्हा शल्य चिकित्सक पदावर बदली झाली होती. त्या पदावर रुजू होऊन त्यांना दोन महिने झाले होते.
जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. चव्हाण यांनी कुडाळ येथील एका हॉस्पिटलची अचानक तपासणी केली होती. त्यावेळी ही तपासणी वादाची ठरली होती. काही खासगी डॉक्टरनी पालकमंत्री व आरोग्य राज्य मंत्र्यांजवळ याबाबत तक्रारही केली होती. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. अखेर मंगळवारी त्यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून काढण्यात आले.
डॉ. चव्हाण यांची बदली त्यांच्या विनंतीनुसार झाली असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यांची औरंगाबाद जिल्हय़ात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी बदली करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकपदी अद्याप कुणाची नियुक्ती झालेली नाही. मात्र, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनाच पदोन्नती मिळण्याची शक्मयता आहे.