कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाही मिरवणूक रद्द
प्रतिनिधी/ सातारा
आज दसरा असल्याने दसऱयाच्या आदल्या दिवशी सातारा शहरातील गांधी मैदानावर झेंडूच्या फुलांचा बाजार भरला आहे. सकाळी झेंडूच्या फुलांचे दर 200 रुपये किलो एवढा होता तर आपटय़ांची पाने 10 रुपयांना पेंडी होती. तसेच सातारकरांनीही आपल्या गाडय़ा धुण्यासाठी सर्व्हीसिंग सेंटरवर रांगा लावल्या होत्या. मात्र यंदाच्या दसऱयाच्या सणावर कोरोनाची छाया पसरल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे यावर्षी कोणतेही सण किंवा उत्सव साजरे करता आले नाहीत. कोरोनाचा कहर कमी झाल्याने साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱयाला मोठे महत्व असते. त्यानिमित्ताने खरेदी करण्यासाठी आदल्यादिवशीच बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसत होती. शहरात झेंडूला मोठी मागणी वाढल्याने गांधी मैदानावर फुल बाजार भरला होता. झेंडूमध्ये लाल आणि पिवळा असे दोन प्रकार विक्रीला होते. सकाळपासूनच 200 रुपये किलोने फुले मिळत होती. दुपारनंतर दीडशेवर भाव आला होता तर सायंकाळी 100 रुपयांवर भाव आला होता. आपटय़ाची पाने 10 रुपयांना जुडी मिळत होती. कोरोनामुळे काही ठिकाणी घरपोहच झेंडू दिला जात होता.
तसेच गाडय़ा धुण्यासाठी सातारा शहरातील सर्व्हीसिंग सेंटरवर गर्दी दिसत होती. दुचाकी 70 रुपये तर चारचाकी गाडी 150 रुपये असे दर आकारण्यात येत होते. दसऱयाच्या दिवशी नवीन उद्योग, व्यवसाय सुरु करण्याबरोबर अनेक ठिकाणी तयारी दिसत होती. सोनेचांदी खरेदी करण्यासाठी व्यापाऱयांनी दसऱयाला खास सुविधा दिल्याच्या जाहीराती दुकानाबाहेर झळकत होत्या. इलेक्ट्रॉनिक्स, वाहनांच्या दुकानाबाहेरही शनिवारीच बुकींग करणाऱयाची तुरळक गर्दी दिसत होती.
शहरातील पालखी मिरवणूक रद्द… शिवप्रभू छत्रपतींच्या राजगादीची विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाची पूर्वापार चालत आलेली परंपरा, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जितक्याच तोलामोलाने पुढे चालु ठेवली आहे. हा शाही सिमोल्लंघन सोहळा सातारकर आणि सर्वसामान्य जनतेचा मोठा उत्सव ठरला आहे. यावेळी विधीवत श्री भवानी तलवारीचे पूजन जलमंदिर पॅलेस येथे झाल्यावर या ऐतिहासिक तलवारीची जलमंदिर ते पोवईनाका अशी पालखीतून मिरवणूक काढण्यात येवून, पोवईनाका येथे सिमोल्लंघनाचे विधीवत पूजन करण्यात येते. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वमूमीवर शहरातील पालखी मिरवणूक व विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.