अभिनेत्री हर्षदा खानविलकर, कांचन जाधव यांची उपस्थिती
प्रतिनिधी / तिसवाडी
धडाडीचा युवा नेता म्हणून सिध्देश श्रीपाद नाईक यांची ओळख असली तरी स्वच्छ प्रतिमेच्या आईवडीलांची पार्श्वभूमी लाभलेला प्रामाणिक व कर्तृत्वान राजकारणी आहे असेच मी म्हणेन. त्यांच्या भावी वाटचालीला माझे नेहमीच आशिर्वाद असतील, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेत्री तथा रंग माझा वेगळा या धारावाहिकेच्या प्रमुख कलाकार हर्षदा खानविलकर यांनी जुने गोवे येथे श्री फाउंडेशनच्या नारी सन्मान कार्यक्रमात केले.
स्व. विजयाताई श्रीपाद नाईक यांच्या स्मरणार्थ जिल्हा पंचायत सदस्य तथा श्री फाउंडेशन अध्यक्ष सिध्देश श्रीपाद नाईक यांनी से गोवा ग्रामपंचायतीच्या पटांगणात नारी सन्मान 2021 कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. यात प्रमुख पाहुण्या या नात्याने हर्षदा खानविलकर बोलत होत्या. यावेळी त्यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री कांचन जाधव, संस्थेचे अध्यक्ष सिध्देश श्रीपाद नाईक, रंगकर्मी प्रदीप नाईक, कुंभारजुवा सरपंच निशीता गावडे, समाज सेवक अन्नपूर्णा शिरोडकर, नॉर्थ गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडनेकर, सांत इस्तेव्ह सरपंच जोनीता डिकोस्ता व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून नारी सन्मान 2021 या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व स्व. विजयाताई श्रीपाद नाईक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी कुंभारजुवा मतदारसंघातील एका महिला गटाने स्वागत गीत सादर केले.
संस्थेचे अध्यक्ष सिध्देश नाईक आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, आपली आई तथा विजयाताई नाईक यांची उणीव न भरून येणारी आहे. तिचे कार्य दीर्घकाळ स्मरणात राहणारे आहे. त्यांनी दारी आलेल्या सर्वांना प्रेम दिले व त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ दरवषी असा कार्यक्रम करण्यात येईल असे अध्यक्षानी जाहीर केले.
प्रसिद्ध अभिनेत्री व कार्यक्रमाच्या खास अतिथी कांचन जाधव आपल्या मनोगतात म्हणाल्या की, यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो पण आपणास येथे वेगळे चित्र पाहायला मिळाले. सिध्देश यांना या उपक्रमांसाठी 100 कर्तृत्वान महिलांची साथ लाभली. हे विशेष होय.
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून श्री फाउंडेशनतर्फे नारी सन्मान’ 21 प्राप्त महिलांचा येथोचीत सन्मान करण्यात आला. यात वैष्णवी विनायक केसरकर, नंदा संभाजी जांबोटकर, श्रद्धा श्रीकांत गावडे, शिल्पा राजेंद्र परब, सीमा आत्माराम नाटेकर, सुचिता अशोक शिरोडकर, सोनाल भोमकर, अक्षता भोसले, अनुजा डिचोलकर, शोभावती गावडे, रुक्मिणी पी. गावडे, लीना प्रेमानंद केसरकर, एलेफ्रिडा पेरेरा, रमाबाई गोविंद शेट, तुळशी नाईक, भारती रंगा च्यारी, कुमुद भिकू नाईक, गंगूबाई पर्वतकर, सुमन मडकईकर, लक्ष्मी हनुमंत फडते, शुभलक्ष्मी आमोणकर, प्रकाशीनी पोपट सावंत, आयव्ही डिमेलो, शशिकला देसाई, लक्ष्मी मोगा काणकोणकर आदींचा समावेश होता. या कार्यक्रमाला कुंभारजुवा मतदारसंघातून 600 हून अधिक महिला उपस्थित होत्या. प्रसिद्ध हास्य कलाकार मनोहर भिंगि यांनी आपल्या विनोदी अदाकारीने उपस्थितांना रिझविले. तर प्रसिद्ध आर जे नम्रता यांनी सूत्रसंचालन केले.