कोल्हापूर / प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट शामराव भाऊसो उर्फ एस. बी. पाटील शिरोळकर (वय 85, राहणार कोठीशाळेजवळ अर्धा शिवाजी पुतळा शिवाजी पेठ) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एडवोकेट शिवराज पाटील, धैर्यशील पाटील आणि डॉक्टर वीरधवल पाटील यांचे ते वडील होत. मूळचे शिरोळ येथील शेतकरीअसणाऱ्या एडवोकेट पाटील यांनी कष्टातून कायद्याची पदवी संपादन केली होती. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात प्रॅक्टिस करताना दिवाणी दाव्यातील तज्ज्ञ वकील म्हणून लौकिक संपादन केला होता. महसूल न्यायाधिकरणाकडे चालणाऱ्या कामांमध्ये त्यांचा हातखंडा होता. अनेक मोठे खटले त्यांनी हाताळले होते.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव आदी पदे त्यांनी भूषविली होती. कोल्हापूर सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीचे ते मार्गदर्शकही होते. युवा वकिलांना ते मार्गदर्शन करीत असत. विरोधी पक्षकाराच्या वकिलांनाही प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले होते. अत्यंत अभ्यासू असणाऱ्या एडवोकेट पाटील यांनी शेवटपर्यंत आपल्या वकिलीचे प्रॅक्टिस सुरू ठेवले होते. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या न्यायालयीन जगतातील एक ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे. एडवोकेट पाटील यांच्या निधनावर कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य एडवोकेट विवेक घाटगे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट रणजीत गावडे यांच्यासह सर्व वकिलांनी शोक व्यक्त केला आहे.