प्रतिनिधी /बेळगाव
आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी बेळगाव ट्रक युनियनने संप पुकारला होता. या संपाला बेळगाव परिसरातील ट्रकचालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. गांधीनगर येथे सांबरा रोडनजीक ट्रकचालकांनी आंदोलन केले. संप असल्याने बेळगावमधून इतर शहरांना होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
वाढलेल्या डिझेल दरामुळे वाहने चालविणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. याबरोबरच माल ओव्हरलोड भरला जात असल्याने त्याचा फटका चालकांना सोसावा लागतोय. तसेच वाहने लोडिंग-अनलोडिंग करताना हमालांचे भाडेदेखील ट्रकचालकांनाच द्यावे लागत असल्याने हा व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे देशभर सुरू असणाऱया आंदोलनामध्ये बुधवारी बेळगावमधील ट्रकचालकांनीही सहभाग घेतला. या आंदोलनात 100 ते 150 ट्रकचालक सहभागी झाले होते.
यावेळी अध्यक्ष नंदकुमार लमाणी, भरमाणी चिकोडी, नामदेव चव्हाण, महम्मद हरिष, गफूर सय्यद यांच्यासह युनियनचे 100 हून अधिक सदस्य उपस्थित होते.
बेळगाव-गोवा वाहतूक ठप्प
बेळगावमधून सर्वाधिक वाहतूक ही गोवा राज्याला होते. बेळगाव ही एक व्यापारी पेठ असल्यामुळे येथून मोठय़ा प्रमाणात धान्य, भाजीपाला यासह उद्योगांमध्ये स्क्रॅप बाहेर पाठविले जाते. परंतु बुधवारी सकाळपासून ट्रक रस्त्यावर धावत नसल्याने बेळगाव-गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याचा परिणाम भाजीपाल्यासह इतर वाहतुकीवर जाणवला.
माल ओव्हरलोड घेतला जाणार नाही : ए. ए. पाच्छापुरी (चेअरमन-बेळगाव लॉरी असोसिएशन)
नव्या नियमावलीनुसार यापुढे हमालीही भाडेमालकालाच द्यावी लागणार आहे. 16 ऑगस्टपासून बेळगाव जिल्हय़ात हा नियम लागू केला जाणार आहे. यापुढे कोणत्याही ट्रकमध्ये ओव्हरलोड भरला जाणार नाही. 20 ते 30 टन क्षमता असताना ट्रकमध्ये 40 टन सामान घातले जात असल्याने रस्तेदेखील खराब होत आहेत. बेळगाव-गोवा मार्गावर ओव्हरलोड वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यापुढे ट्रकमध्ये माल ओव्हरलोड घातला जाणार नाही, असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
‘जिसका भाडा उसका हमाल’ : रवी हलकर्णीकर (ट्रकचालक)
ओव्हरलोडसह ‘जिसका भाडा उसका हमाल’ या मागणीसाठी ट्रकचालकांचे देशभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बेळगावमधूनही प्रतिसाद देण्यात आला. बुधवारी तब्बल 140 ते 150 ट्रक वाहतूक ठप्प ठेवून ट्रकचालकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले