नवनिर्वाचित अध्यक्ष बायडेन यांच्या संघाला माहिती देण्यास प्रारंभ
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जवळपास दोन आठवडय़ांनी अखेर त्या देशाचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य केला आहे. आता व्हाईटहाऊसकडून नवे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या संघाला अमेरिकेची गोपनीय माहिती देण्यास व्हाईट हाऊसने प्रारंभ केला आहे. त्यामुळे लवकरच ट्रम्प आपल्या कुटुंबासह हे सरकारी निवासस्थान सोडतील आणि बायडेन यांच्याकडे अधिकृतरित्या सत्तेची सूत्रे सोपवितील, अशी शक्यता आहे.
निवडणुकीत पराभव होणार हे स्पष्ट दिसत असतानाही ट्रम्प यांनी तो मान्य करावयास नकार दिला होता. निवडणुकीत भ्रष्टाचार करून डेमॉपेटिक पक्षाने विजय मिळविल्याचा आरोप करत त्यांनी काही प्रांतांमध्ये न्यायालयात दादही मागितली होती. तथापि, न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळल्या. काही प्रांतांमध्ये त्यांनी फेरमतगणनेची मागणीही केली होती. फेरमतगणनेतही बायडेन यांच्या विजयाची घोषणा करण्यात आल्यानंतर ट्रम्प यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.
20 जानेवारीला शपथविधी
नवनिर्वाचित अध्यक्ष जोसेफ बायडेन यांचा अध्यक्षपदी शपथविधी अमेरिकेच्या पद्धतीप्रमाणे 20 जानेवारी 2021 यादिवशी होणार आहे. त्यापूर्वीच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांची घोषणा केली आहे. आपल्या मंत्रिमंडळात विविध वर्णांच्या व वंशांच्या व्यक्तींना स्थान देण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महिलांनाही मानाची स्थाने मिळणार आहेत. देशाच्या अर्थमंत्रिपदी त्यांनी यापूर्वीच जेनेट येलीन यांची निवड केली आहे. तर राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी अर्विल हेलनेस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.