- वाढत्या रुग्ण संख्येमुळे तामिळनाडू सरकारने घेतला निर्णय
ऑनलाईन टीम / चेन्नई :
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. त्यातच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत तामिळनाडू सरकारने 10 मे पासून पुढील दोन आठवड्यांसाठी राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात आता 10 ते 24 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सांगितले की, कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले, राज्यात 10 मे रोजी पहाटे 4 वाजल्यापासून 24 मे च्या पहाटे 4 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन जारी असणार आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये मागील 24 तासात तब्बल 26,465 नव्या रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यासोबतच राज्यातील एकूण आकडा 13 लाख 23 हजार 965 वर पोहोचला आहे. कालच्या दिवसात 197 जणांनी आपला जीव गमावला. तर आता पर्यंत 15,171 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 22,381 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1,35,355 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर चेन्नईमध्ये 6,738 नवे रुग्ण आढळून आले. तर एकूण संख्या 3,77,042 इतकी आहे. तर 5,081 जणांचा मृत्यू झाला आहे.