श्रीनगर / वृत्तसंस्था
श्रीनगरमधील नौगाम परिसरामध्ये गुरुवारी भाजप नेते अन्वर खान यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर हाती घेण्यात आलेल्या शोधमोहिमेवेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. पुलवामामधील काकापोरा भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. हल्लेखोर दहशतवादी एका तीन मजली इमारतीत दडून बसल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर जवानांनी स्फोटकांद्वारे ही इमारत उडवली. यात तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तर, दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी नागरिकांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून मोठय़ा प्रमाणावर स्फोटके व शस्त्रसाठा जप्त केला आहे. भाजप नेत्याच्या घरावर गुरुवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात तेथे तैनात असलेला एक सुरक्षा रक्षक ठार झाला होता. सदर हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सहभाग उघड झाला होता.
…….