चंदगड आगाराकडे बस सुरू करण्याची मागणी
वार्ताहर / तुडये
कोरोनाच्या महामारीमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तुडये (ता. चंदगड) परिसरातील बससेवा बंद करण्यात आल्या. नऊ महिन्यांनंतरही या परिसरातील बस बंदच राहिल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड आगाराच्या तुडये परिसरातील चंदगड, कोलिक, हाजगोळी, बेळगाव-हाजगोळी या बसेसच्या संपूर्ण फेऱया रद्द केल्या आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांना चंदगडच्या प्रवासाकरिता बेळगावला फेरी मारून जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय
तुडये, हाजगोळी, कोलिक, म्हाळुंगे (खा.), मळवी, सरोळी, ढेकोळी, सुरुते येथील विद्यार्थी कॉलेजसाठी कार्वे, पाटणे फाटा, हलकर्णी व चंदगड येथे बसने पास काढून प्रवास करतात. सध्या कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आता कॉलेजला जाताना गैरसोयीचे बनले आहे. परिसरातील बससेवा चंदगड आगाराने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.