वृत्तसंस्था/ अंकारा
नाटोचे सदस्य देश असलेल्या तुर्कस्तान आणि ग्रीस यांच्यात तेलसाठय़ावरून तणाव शिगेला पोहोचला आहे. ग्रीसच्या क्रेटे बेटसमुहानजीक युद्धाभ्यास करण्याची घोषणा आता दोन्ही देशांनी केली आहे. भूमध्य समुद्रात मिळालेल्या तेल आणि वायूच्या विशाल भांडारावरून दोन्ही देशांदरम्यान वाद निर्माण झाला आहे. संबंधित परिसरापासून दूर राहण्याचा इशारा तुर्कस्तानने अन्य जहाजांना दिला आहे.
तुर्कस्तानने शोधक जहाज पाठविण्याची घोषणा केल्यावर ग्रीसनेही युद्धाभ्यासाची घोषणा केली आहे. तर नाटो सदस्यांमधील वाढणारा तणाव कमी करण्यासाठी जर्मनीने विदेशमंत्री हेइको मास यांना अथेन्स आणि अंकारा येथे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीसचे पंतप्रधान क्रिआकोस मित्सोत्सिक यांची मास हे भेट घेणार आहेत. त्यानंतर जर्मनीचे विदेशमंत्री तुर्कस्तानला जातील. दोन्ही देशांदरम्यान क्रेटे आणि सायप्रसच्या किनाऱयावर वादग्रस्त जलहद्दीत तेल आणि वायूचे विशाल भांडार मिळाल्यावर तणाव वाढला आहे.
ग्रीसने युरोपीय महासंघात धाव घेतली आहे. महासंघाने दोन्ही देशांना चर्चेचे आवाहन केले आहे. तर फ्रान्सने याप्रकरणी ग्रीसची बाजू उचलून धरली आहे. शोधक जहाज वादग्रस्त जलक्षेत्रात 27 ऑगस्टपर्यंत शोधकार्य सुरूच ठेवणार असल्याची घोषणा तुर्कस्तानने केली आहे. या घोषणेमुळेच ग्रीस नाराज झाला आहे.
आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गाने प्रतिक्रिया देत आहोत. तसेच आम्ही राजनयिक आणि मोहिमात्मक पातळीवर सज्ज आहोत. स्वतःच्या सार्वभौम अधिकारांचे आम्ही रक्षण करू असे ग्रीस सरकारने म्हटले आहे. तर तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान यांनी शोधक जहाज परत बोलाविण्याचे पाऊल उचलणार नसल्याचे सांगितले आहे. ग्रीसने स्वतःला अराजक स्थितीत ढकलले असून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नसल्याचा दावाही एर्दोगान यांनी केला आहे.
ग्रीसच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातने पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते. संयुक्त अरब अमिरातने स्वतःच्या एफ-16 विमानांना क्रेटे बेटानजीक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. काळय़ा समुद्राच्या किनाऱयानजीक 320 अब्ज क्यूबिक मीटर नैसर्गिक वायूचा साठा मिळाल्याची घोषणा एर्दोगान यांनी केली आहे.