प्रतिनिधी/ सातारा
शहरातील एसटी स्टॅण्ड परिसरातील सेवन स्टॉर मॉलसमोर एका युवकाने वाहतूक पोलिसांकडून आकारण्यात येणाऱया अवाढव्य दंडाच्या रक्कमेवर आक्षेप नोंदवत अंगावर डिझेल ओतून घेतले. युवकाने अंगावर डिझेल ओतताच पोलीस व नागरिकांनी प्रसंगावधान साधत युवकाला पकडले. यामुळे मोठा अनर्थ टळला. त्याला ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. युवराज उत्तम लोखंडे (वय 33, रा. शिवाजीनगर शाहूपुरी) असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एसटी स्टॅण्ड परिसरात असणाऱया सेवन स्टॉर मॉल समोर वाहतूक पोलीस सोमनाथ शिंदे हे कर्तव्य बजावत होते. यावेळी ट्रिपलसीट चाललेल्या दुचाकी चालकाला अडवून 7 हजार 500 रूपयांचा दंड मागितला. हा दंड मागताच चालकाने दंड देण्यास नकार दिला. यामुळे वाहतूक पोलीस शिंदे व युवकाच्यात वाद सुरू झाला. हा वाद वाढल्याने जवळ पैसे नाहीत असे कारण युवकाने दिले. मी वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्याचेही कबुल केले पण दंड भरणार नाही असा पवित्रा त्याने घेतला. मी कोरोनातून नुकताच बरा झालो असून 2 महिने झाले नोकरी नाही. अशात माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. असे वारंवार सांगूनही वाहतूक पोलीस शिंदे दंड वसुल करण्यावर ठाम राहिले. यामुळे संतापलेल्या युवकाने अंगावर डिझेल ओतून घेतले. डिझेल ओतताच पोलीस व नागरिकांनी त्याला पकडले. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना कळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला ताब्यात घेतले. त्याच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
नियम मोडून टोकाचे पाऊल
सोमवारी सेवनस्टॉर मॉलच्या चौकात गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडवत होते. यावेळी युवराज लोखंडे हा ट्रिपल सीट गाडी चालवत कोंडीतून कर्कश हॉर्न वाजवत सुसाट निघाला. ही बाब कर्तव्यावर असणाऱया वाहतूक पोलीस शिंदे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्याला अडवून नियमांचे उल्लघंन केल्याचे सांगत दंड भरण्यास सांगितले. यावरून सुरू झालेल्या वादात युवकाने गाडी बाजुला उभी केली आणि डिझेल घेऊन आला. डिझेल अंगावर टाकून आत्मदहन करेन असा इशारा दिला. परंतु वाहतूक पोलीस शिंदे यांना हा इशारा खरा वाटेपर्यंत युवराजने अंगावर डिझेल ओतून घेतले. यामुळे कोंडी सोडण्याऐवजी गर्दी होऊन पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली.
स्टंटबाजी करू नका
वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजेत. दंडाची रक्कम ही नव्या नियमांप्रमाणे आकारण्यात येत आहे. सर्वांना आवाहन करत आहे. नियमांचे पालन करा अशी स्टंटबाजी करून नियम मोडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.