मंदीराच्या दानपेटीत पडणाऱया पैशाचा उपयोग गोर-गरीबांच्या शिक्षणासाठी केला जाणे ही प्रेरणादायी बाब आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर साधारणतः 450 वर्षांचे जुने इच्छादेवी मंदीर आहे. तेथे या दोन्ही राज्यांमधील 10 लाखांहून अधिक भाविक येतात. त्यामुळे या मंदीराची दानपेटी पैशांनी भरून वहात असते. या मंदीराच्या व्यवस्थापनाने या पैशाचा उपयोग गरीब मुलांच्या शिक्षणासाठी करण्याची योजना बऱयाच वर्षांपूर्वीपासून लागू केली आहे.
मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांमधल्या एका पर्वतावर हे मंदीर आहे. या मंदीराने भक्तांनी दिलेल्या देणग्यांमधून आणि दानपेटीत पडणाऱया पैशांमधून एक शाळा सुरू केली. या शाळेत केवळ गरीबांच्या मुलांनाच प्रवेश दिला जातो. त्यांना शिक्षण विनामूल्य दिले जाते. तसेच शिक्षणाची सामग्रीही दिली जाते. आता या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक आरोग्यकेंद्रही स्थापन करण्याची योजना आहे. विद्यार्थ्यांसमवेत इतर गरजवंत गावकऱयांसाठीही या केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या केंद्रात दोन डॉक्टर्स, एक नर्स, एक कंपांऊंडर, दोन वॉर्डबॉय असा कर्मचारीवर्ग असेल. रूग्ण्वाहिकेची सोयही होणार आहे.
या देवस्थानच्या आणखीही काही अभिनव योजना आहेत. ज्या पर्वतावर मंदीर आहे, तेथील सपाट जागेत नक्षत्र वाटिका तयार करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. या वाटिकेत 27 नक्षत्रांना अनुकूल अशा वनस्पतींची लागवड पुराण शास्त्रानुसार केली जाणार आहे. या वृक्षांची पूजा करण्याची सोय होणार आहे.
संस्कृत, शास्त्रीय संगिताचे शिक्षण याच परिसरात असणाऱया मां पितांबरा मंदिराची विश्वस्त संस्था सामाजिक समरसता क्षेत्रात कार्यरत आहे. या विश्वस्त संस्थेच्या वतीने विविध समाजघटकांमधील मुलांना संस्कृत भाषा आणि भारतीय शास्त्रीय संगिताचे शिक्षण दिले जाते. गेल्या 24 वर्षांपासून येथे संस्कृत पाठशाळा कार्यरत आहे.