प्रतिनिधी/दापोली
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास सरकारकडून सशर्त परवानगी मिळाल्या नंतर दापोली उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यासाठी परराज्यातील मजुरांची एकच झुंबड उडाली आहे. सोमवारी दुसऱ्या दिवशी सकाळी पासून या मजुरांनी आपल्या कुटुंबासह दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर प्रचंड गर्दी करून रांगा लावल्या.
पहिल्या दिवशी रविवारी सुमारे अडीचशे मजुरांनी तपासणी करून घेतल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे यामुळे स्थानिक पातळीवर परराज्यातील अनेक मजूर अडकून पडले आहे सर्व व्यवहार व व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या हाताला रोजगार नाही यामुळे परराज्यातील ही सर्व कुटुंबे आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी सरकार तर्फे सशर्त परवानगी देण्यात आली याकरिता त्यांची स्थानिक पातळीवर आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
तर, आज सोमवारी परराज्यातील अनेक कुटुंबांची तपासणी करून घेण्यासाठी सकाळपासून झुंबड उडाली होती. यावेळी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला. मात्र पोलिसांनी वेळीच यात हस्तक्षेप करून सर्वांना योग्य अंतर राखून रांगेत उभे केले. ही रांग उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर पर्यंत येऊन पोचली होती. यात त्यांना ताप आहे का व कोरणा ची प्राथमिक लक्षणे आहेत का यांची तपासणी करण्यात येत आहे. व सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. रविवारी तपासण्यात आलेल्यापैकी कोणाही मजुराला किंवा मजुराच्या घरातील कोणालाही कोरोना सदृश्य लक्षणे नसल्याचे देखील उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. यानंतर या सर्व मजुरांना स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांची व ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत. त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. याकरिता स्थानिक पातळीवर या मजुरांना देण्यात आलेले आरोग्य प्रमाणपत्र हे ग्राह्य धरले जाणार आहे तपासणी करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालया सह खाजगी वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्यांना देखील मुभा देण्यात आली असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी यावेळी बोलताना सांगितले.