प्रतिनिधी/धारबांदोडा :
सोनावली कुळे येथील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याचे खुललेले सौंदर्य सध्या पर्यटकांना खुणावत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेले सहा महिने घरात बसून असलेले विद्यार्थी तसेच अन्य निसर्गप्रेमींची पावले विरंगुळय़ासाठी दूधसागरकडे वळत आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठय़ासंख्येने विद्यार्थी आपला दिवस या धबधब्यावर घालवित आहेत. याठिकाणी वाढती गर्दी लक्षात धबधबा परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे.
दूधसागर धबधब्याचे सौंदर्य भुरळ पाडणारे आहे. पावसाळय़ात तर ते अधिकच विलोभनीय असते. उंच डोंगर कडय़ावरुन कोसळणारा हा जलप्रपात म्हणजे निसर्गदेवतेच्या कुंचल्यातून साकारलेले अप्रतिम चित्रच जणू. रेल्वे पुलावर उभे राहिल्यास फेसाळणाऱया धबधब्याचे जलतुषार व त्यांचे अंगावर पडणारे सुक्ष्म फवारे एक वेगळीच अनुभूती देणारे आहेत. मात्र कोरोना महामारीमुळे यंदा प्रवासी रेल्वे बंद असल्याने निसर्गप्रेमींना पावसाळय़ातील दुधसागरच्या या सौंदर्या दर्यनाला मुकावे लागले आहे.
सप्टेंबरपासून अनलॉक शिक्षण सुरु झाल्यापासून व त्यापूर्वीही राज्याच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी दूधसागर धबधब्याचे हे सौंदर्य अनुभवले आहे. कर्नाटक राज्यातूनही विद्यार्थी या ठिकाणी येताना दिसतात.
सध्या रेल्वे गाडय़ा बंद असल्यातरी कुळेहून आडरानातून चालत जाऊन या धबधब्याच्या सौंदर्याचा आनंद विद्यार्थी व पालकवर्ग लुटताना आढळतात. त्यासाठी कुळेहून सुमारे तेरा कि. मी. अंतर पायपिट करावी लागते. रेल्वे बंद असल्याने रेल्वे मार्गाने विद्यार्थ्यांना चालत जाणे सोयिस्कर ठरत आहे.
गेल्या सहा महिन्यापासून विद्यार्थी वर्ग घरात कोंडून पडला होता. टिव्ही व स्मार्टफोन वगळय़ास मनोरंजनाची इतर सर्व साधने बंद होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर थोडासा विरंगुळा म्हणून तो आता घराबाहेर पडू लागला आहे. असा विरंगुळा शोधणाऱया अनेक विद्यार्थ्यांची पावले शनिवार व रविवारी मग दूधसागरकडे वळतात.
26 किलो मिटर पायपिट करुन येतात विद्यार्थी
दूधसागरवर येणाऱया अशाच काही, विद्यार्थ्यांकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, काही मित्रांनी दूधसागर धबधब्यावर भेट दिल्याचे फोटो व व्हीडीओ सामाजिक माध्यमांवर शेअर केल्याचे त्यांनी सांगितले. काहींनी व्हॉट्सऍपवर स्टेटस टाकले आहेत. हे फोटो पाहून पाय घरी थांबेनात. मग मित्रांशी संपर्क साधून दूधसागर येण्याचा बेत आखल्याचे त्यांनी सागितले. दूधसागरवर ये-जा करण्यात सुमारे 26 कि. मी. अंतर पायी तुडवावे लागते. मात्र एवढे अंतर कापूनही एकदा धबधब्याचे दर्शन झाले म्हणजे पायपिट केल्याचा शिण कुठच्याकुठे निघून जातो.
रेल्वे मार्गाने जाणे हे बंधनकारक असले तरीही थकलेल्या जिवाला विरंगुळा देण्यासाठी विद्यार्थी सध्या येथे भेट देत आहेत. त्यांना दूधसागर धबधब्यावरील संभाव्य धोक्याची कल्पना नसल्यामुळे व तिथे योग्य मार्गदर्शन करणारे कुणीही नसल्याने सरकारने तेथे सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी जाणकारांकडून होत आहे.
सुरक्षेच्या उपययोजना आखाव्या लागतील
यासंबंधी कुळे पंचायतीचे सरपंच मनीष लांबोर म्हणाले, दूधसागर संबंधित यंत्रणेने जर परवानगी दिल्यास कुळे शिगांव पंचायत लाईफ जॅकेट पुरविण्यास तयार आहे. शिवाय धबधब्यावर ने-आण करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी गाईडही देऊ शकते. सध्या जे प्रकार तेथे चालू आहे, ते पाहिल्यास एखादा पर्यटक चुकून पाण्यात बुडाल्यास त्याला कोण जबाबदार असेल ? रेल्वे, वन्यजीव विभाग की कुळे पोलीस हा खरा प्रश्न आहे. संबंधित यंत्रणेने त्यावर विचार करणे गरजेचे आहे. सहा महिने घरात बसून असलेले विद्यार्थी व इतर पर्यटक जर मनाला विरंगुळा म्हणून धबधब्यावर भेट देत असतील, तर त्यांचा विचार होणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.