ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तरप्रदेशच्या नोईडा विभागातील जेवर येथे देशातील सर्वात मोठे विमानतळ उभारले जात आहे. या विमानतळाचे कंत्राट स्वित्झर्लंडच्या झुरीच कंपनीला देण्यात आले असून, आज (दि.7) नोईडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (नियाल) आणि झुरीच कंपनीमध्ये विमानतळ उभारणीचा करार होणार आहे.
झुरीच इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने या प्रकल्पासाठी यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लिमिटेड नावाने स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी बनविली आहे. ही कंपनी नियाल यांच्यात आज करारावर सह्या करणार आहे. कोरोनामुळे झुरीच कंपनीचे प्रतिनिधी भारतात येऊ शकले नाहीत.
जेवर येथे उभारण्यात येणाऱ्या विमानतळासाठी 29,500 कोटींची निविदा होती. अदाणी, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड अशा अनेक कंपन्यांनी कंत्राट घेण्यासाठी बोली लावली होती. मात्र झुरीच कंपनीने प्रती प्रवासी 400.95 रुपये महसूल देण्याची तयारी दाखविली. ही सर्वाधिक किंमत ठरल्याने झुरीच कंपनीला विमानतळाचे कंत्राट मिळाले. 2023 पासून या विमानतळावरून उड्डाणे सुरु करण्याचे ध्येय निश्चित केले गेले आहे. 22 जिल्ह्यांना या विमानतळाचा लाभ होणार आहे.