कणकवलीत ‘एसी’ मेकॅनिकवर काळाचा घाला
वार्ताहर / कणकवली:
महामार्गाच्या ‘डायव्हर्शन’च्या ठिकाणी पलिकडच्या बाजूला जात असलेल्या दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कणकवली शहरातील एअर कंडिशनर दुरुस्तीच्या दुकानाचे मालक अनिल रमेश कुसवरकर (36, रा. कलमठ – बिडय़ेवाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचाराअंती त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात बसस्थानकासमोरील ‘डायव्हर्शन’च्या ठिकाणी गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कुसवरकर हे कणकवली पेट्रोल पंपाकडून दुचाकीने गोव्याच्या दिशेने जात होते. तर याच दरम्यान गोव्याच्या दिशेहून कणकवली बाजारपेठेच्या दिशेने जाण्यासाठी दुचाकीस्वार महेश तेली (सध्या रा. जानवली) हे फ्लायओव्हर ब्रीजच्या दिशेने वळत होते. यावेळी समोरून येणाऱया अनिल कुसवरकर यांच्या दुचाकीची तेली यांच्या दुचाकीला समोरून धडक बसली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार खाली कोसळले. मात्र, अनिल हे जागीच बेशुद्ध पडल्याचे तेली यांनी सांगितले.
अपघात झाल्यानंतर तेथे जमलेल्या काहींनी अनिल यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी त्यांचा मृत्यू झाला. कुसवरकर हे एसी दुरुस्तीचे काम करत होते. कणकवली बाजारपेठेत महापुरुष मंदिरासमोर त्यांचे जस्मीन कुलिंग सर्व्हीस नावाने दुकान होते. एसीचे टेक्निशियन असल्याने त्यांची अनेकांशी ओळख होती.
अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली होती. अनिल यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, छोटा मुलगा, भाऊ असा परिवार आहे. अनिल यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला होता. अपघाताची माहिती मिळताच गुरुवारी सायंकाळी पोलीस हवालदार उत्तम पवार उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, या अपघाताची पोलिसात नोंद नव्हती.