जयराम ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी /बेळगाव
टाटा ग्रुप च्या पुढाकाराने धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथील ’धर्मशाला स्काय-वे’ चे हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. बुधवारी, 19 जानेवारी 2022 रोजी हा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी टाटा ग्रुपचे सीईओ आलोक कपूर व धर्मशाळा रोप वे च्या संचालिका नेहा पंडित उपस्थित होत्या. हा प्रकल्प 207 कोटीचा असून एकूण 40 वर्षे तो कार्यरत राहू शकणार आहे.
या प्रकल्पामुळे मेक्लोडगंज ते धर्मशाला ही वाट सुकर होणार आहे. टाटा ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे टीआयआरएल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर) तसेच पर्यटन विभाग आणि सिव्हिल एव्हीएशन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा प्रकल्प उभा केला गेला आहे. भारतातील काही अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प म्हणून ओळख मिळविलेल्या या प्रकल्पामुळे पर्यटकांसाठी आता धर्मशाला ते मेक्लोडगंज हा प्रवास 35 मिनिटांचा न राहता केवळ 5 मिनिटांत करता येणार आहे.
या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना ‘धर्मशाला रोप वे’ लिमिटेडच्या संचालिका नेहा पंडित (रुपाली किशोर सातोस्कर) यांनी ही रोप वे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केली आहे, धर्मशाला मध्ये येणाऱया प्रवाश्यांसाठी हा सुखद अनुभव असणार आहे. यामध्ये प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आधुनिक रेस्टरूम व तत्सम सुविधा सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन तयार केल्या गेल्या आहेत असे सांगितले. नेहा यांची जडणघडण कोल्हापूरमध्ये झाली असून त्या तरुण भारत चे समुह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या भाची आहेत. स्थानिकांनी आणि पर्यटकांनी मोठय़ा प्रमाणात या रोपवेचा आनंद घेण्याचे आवाहन टाटा ग्रुप तर्फे नेहा पंडित यांनी केले आहे.