कुटुंबियांसमवेत उपस्थिती : सिंधुदुर्गनगरीत हेलिकॉप्टरने दाखल : भोगवेतील पंचतारांकित रिसॉर्टवर मुक्काम
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
प्रसिद्ध अभिनेते आमीर खान कुटुंबियांसमवेत मंगळवारी सिंधुदुर्गात दाखल झाले. या दौऱयाबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली असून आमीर खान भोगवे किनारपट्टीवरील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये चार दिवस मुक्काम करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सायंकाळी चार वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर हेलिकॉप्टरने दाखल झाल्यानंतर आमीर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन थेट पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेतली. त्यांचा हा खासगी दौरा असल्याने पुढील दौऱयाबाबत गोपनीयता पाळण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे दौऱयाचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान ते चार दिवस सिंधुदुर्गमध्येच थांबणार असून 1 जानेवारीला मुंबईला रवाना होणार आहेत.
आमीर खान अभिनयाबरोबरच दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या दौऱयाची अधिकृत माहिती गोपनीय ठेवण्यात आली असली तरी ‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्श्वभूमीवर ते जिल्हय़ात आल्याचे खात्रीशीर समजते. दौऱयात त्यांच्यासोबत पत्नी किरण राव व मुलगीही असून ही सर्व मंडळी भोगवे येथील ‘कोको शंभाला’ या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये मुक्काम करणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हे कुटुंब प्रथमच सिंधुदुर्गात आले असल्याचेही बोलले जात आहे.
भोगवे येथील या रिसॉर्टमध्ये अनेक फिल्मस्टार तसेच मोठमोठे सेलिब्रेटी येत असतात. मात्र त्यांच्या आगमनाबाबत अत्यंत गोपनियता पाळण्यात येते. आमीर खानबाबतही अशाच प्रकारे गोपनीयता पाळण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात अनेक फिल्मस्टारनीही जमिनी घेतल्या आहेत.