शोधमोहीम सुरूच- तिसऱया दिवशीही शोध नाहीच
प्रतिनिधी/ बेळगाव
हनुमाननगर येथील रेसकोर्स गोल्फ मैदान परिसरात गुरुवारी निदर्शनास आलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी वनखात्याने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले असले तरी अद्याप हाती काहीच लागले नाही. तिसऱया दिवशीही बिबटय़ाच्या पाऊलखुणा किंवा इतर कोणतीच बाब निदर्शनास आली नाही. त्यामुळे रेसकोर्स परिसरात निदर्शनास आलेला बिबटय़ा होता की केवळ अफवा? अशी चर्चा होत आहे.
शनिवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने रेसकोर्स परिसरात सापळा लावलेल्या ठिकाणी पाहणी केली. त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सात ठिकाणी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांचे फुटेज पाहिले, परंतु त्यातही काहीच आढळून आले नाही. त्यामुळे रेसकोर्स परिसरात फिरायला गेलेल्या नागरिकांना खरोखरच बिबटय़ासदृश प्राणी दिसला होता की हेतुतः ही कोणी तरी अफवा पसरवली आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. परिसरात त्याच्या पावलांच्या ठशांचा शोध घेण्यात आला. मात्र काहीच आढळून आले नाही. त्यामुळे रेसकोर्स परिसरात कोणताच वन्यप्राणी दिसला नसून ही केवळ अफवा असल्याचे बोलले जात आहे. रेसकोर्स मैदानावर फिरायला गेलेल्या काही नागरिकांना बिबटय़ासदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर वनखात्याने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. त्यांनी रेसकोर्स परिसर पिंजून काढला असला तरी अद्याप वनविभागाच्या हाताला काहीच लागले नाही. त्यामुळे तिसऱया दिवशीही वनखात्याला बिबटय़ासदृश प्राण्याबाबतचा शोध घेण्यात अपयश आले आहे.