वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा नेमबाज अभिषेक वर्मा याने कायद्याची पदवी घेतली आहे. आता तो नेमबाजीबरोबरच वकिली करण्यास प्रारंभ करण्याचे ठरविले आहे. व्यावसायिक वकिली करण्यासाठी अभिषेकने बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे अर्ज दाखल केला आहे.
2020 च्या कालावधीतील उत्तरार्धात वकिली करण्याची त्याची योजना असून त्याला काही दिवसामध्ये खासगी वकिली करण्याची परवानगी दिली जाईल. पुढीलवर्षी होणाऱया ऑलिंपिक स्पर्धेसाठी त्याने नेमबाजी सरावावर अधिक भर देण्याचे ठरविले आहे. कोरोना महामारी समस्येमुळे गेल्या मार्चपासून नेमबाज अभिषेक वर्माला स्वगृहीच राहावे लागले होते. अभिषेक वर्माचे निवासस्थान चंदीगडमध्ये असून तो सध्या सराव करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिषेकने यापूर्वी दोनवेळा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. 2018 च्या आशियाई क्रीडास्पर्धेत त्याने कास्यपदक मिळविले होते. वकिली करण्याची अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर आपण एका ज्येष्ठ वकिलाच्या मार्गदर्शनाखाली अनुभवाकरिता राहणार असल्याचे वर्मा याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.