प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी या हेतूने रहदारी वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसल्याचे सोमवारी दिसून आले. शहरात नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी रहदारी वाहतूक पोलिसांकडून टोईंग केल्या आणि वाहनधारकांना दंड आकारण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने सर्व काही बंद होते. या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांवर रहदारी पोलीस नजर ठेवून दंड आकारत होते. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी टोईंगच्या कामाला पूर्णविराम दिला होता. मात्र आता अनलॉक होताच रहदारी वाहतूक पोलीस आपल्या कामात गुंतल्याचे दिसून आले.
यावेळी शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्लीसह अनेक ठिकाणी नो पार्किंगच्या जागी लावलेल्या 8 दुचाकी पोलिसांनी टोईंग केल्या. यावेळी मोटार व्हेईकल ऍक्टनुसार विना हेल्मेट, विनापरवाना अशा 14 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच विनामास्क फिरणाऱया 20 जणांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.