अंतिम लढतीत धुव सितवालावर 5-2 गेम्सनी मात
वृत्तसंस्था/ भोपाळ
भारताचा प्रमुख बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने राष्ट्रीय बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे जेतेपद स्वतःकडेच राखताना अंतिम लढतीत पीएसपीबीच्या धुव सितवालाचा 5-2 गेम्सनी पराभव केला. त्याचे हे बिलियर्ड्सचे एकूण 11 वे राष्ट्रीय जेतेपद आहे.
सोमवारी संध्याकाळी सितवालाने 64 व 42 चे ब्रेक नोंदवत आघाडी घेतली होती तर पंजकने 56 व 46 चे बेक नोंदवत 1-1 अशी बरोबरी साधली होती. तिसरा गेम जिंकून सितवालाने 84 गुणांचा ब्रेक घेत आघाडी घेतली. 101 चा शतकी बेक मिळविल्यानंतर तो चौथा गेमही जिंकण्याच्या मार्गावर होता. पण त्याच्याकडून झालेल्या अल्पशा चुकीचा फायदा अडवाणीने घेतला. अडवाणीने 127 चा ब्रेक नोंदवत हा गेम जिंकून 2-2 अशी बरोबरी साधली. यानंतर अडवाणीला उत्तम सूर गवसला आणि पाचव्या व सहाव्या गेममध्ये प्रत्येकी 150 गुणांचे अभेद्य ब्रेक नोंदवत 4-2 अशी आघाडी घेतली.
सितवालाने हार न मानता संयम आणि कौशल्यपूर्ण व धीरोदात्त खेळ करीत 134 गुणांचा ब्रेक नोंदवला. पण दुर्दैवाने त्याला स्थितीवर नियंत्रण राखता आले नाही आणि अडवाणीने या संधीचा फायदा घेत सुरक्षित स्थिती निर्माण केली. यानंतर अडवाणीने मागे वळून पाहिले नाही. त्याने 148 चा अभेद्य ब्रेक नोंदवत गेमसह जेतेपदही निश्चित केले.
‘धुव माझा अगदी जिवलग मित्र असून आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करतो. एखाद्या मोठय़ा किंवा अशा प्रकारच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिवलग मित्राविरुद्ध खेळताना खूपच अवघड जाते. पण स्नूकरमध्ये अलीकडे अपयशी ठरल्यानंतर या विजेतेपदाने मला एक प्रकारे दिलासा मिळाला आहे,’ अशा भावना अडवाणीने व्यक्त केल्या. ‘राष्ट्रीय बिलियर्ड्स चॅम्पियनशिप ही निश्चितच अवघड स्पर्धा आहे. वरिष्ठांची ही स्पर्धा 11 व्या वेळी जिंकता आल्याने मी रोमांचित व कृतज्ञ झालो आहे. कारकिर्दीतील माझे हे एकूण 35 वे जेतेपद आहे,’ असेही तो म्हणाला.