9 आमदारांचा पत्ता कट : राज्यमंत्र्याचा बदलला मतदारसंघ
भाजपने रविवारी रात्री उमेदवारांची 8 वी यादी जारी केली असून यात 45 नावे सामील आहेत. भाजपने या यादीत 9 महिलांना स्थान दिले आहे. बलिया नगर मतदारसंघात मंत्री स्वाति सिंह यांचे पती दयाशंकर यांना तिकीट देण्यात आले आहे. दयाशंकर आणि त्यांच्या पत्नी लखनौच्या सरोजनीनगर मतदारसंघासाठी इच्छुक होते, परंतु भाजपने माजी आयपीएस अधिकारी राजेश्वर सिंह यांना मैदानात उतरविले आहे.
नव्या यादीत बलियाच्या बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांना उमेदवारी नाकारली आहे. तर कृष्णानंद राय यांच्या पत्नी अलका यांना मोहम्दाबाद येथील उमेदवारी मिळाली आहे. 2005 मध्ये कृष्णानंद राय यांची बाहुबली मुख्तार अंसारीकडून हत्या करविण्यात आली होती. भाजपच्या यादीत सर्वाधिक 9 ओबीसी उमेदवार आहेत. त्यानंतर 8 दलित, 6 ब्राह्मण आणि 5 ठाकूर समुदायाचे आहेत. भाजपने आतापर्यंत 340 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
राणी गरिमा सिंह यांना उमेदवारी नाही
अमेठी राजघराण्याची लढाई रंगतदार झाली आहे. पक्षाने राणी गरिमा सिंह यांच्याऐवजी त्यांचे पती डॉक्टर संजय सिंह यांना अमेठी मतदारसंघातून मैदानात उतरविले आहे. संजय सिंह देखील मंत्री राहिले ओत. बलिया नगरचे आमदार आणि मंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांचा मतदारसंघ बदलण्यात आला आहे. आनंद स्वरुप शुक्ला हे आता बैरिया मतदारसंघात उमेदवार असणार आहेत. मंत्री अनिल राजभर यांना शिवपूर मतदारसंघाचे तिकीट मिळाले आहे. अलाहाबाद उत्तरमधून हर्ष वाजपेयी यांना संधी मिळाली आहे. कोरांव मतदारसंघात आरती कोल यांच्याऐवजी राजमणि कोल निवडणूक लढवतील. आंबेडकरनगर जिल्हय़ात टांडा मतदारसंघात आमदार संजू देवी यांच्या जागी माजी जिल्हाध्यक्ष कपिल देव वर्मा यांना उमेदवारी मिळाली आहे. आलापूरच्या आमदार अनिता कमल यांच्याऐवजी त्यांचे सासरे आणि माजी आमदार त्रिवेणी राम निवडणूक लढवतील.
देवमणि यांना तिकीट नाकारले
सुल्तानपूरच्या लंभुआचे आमदार देवमणि द्विवेदी यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. आमदार सीताराम वर्मा यांना लंभुआतून संधी देण्यात आली आहे. देवमणि हे सातत्याने ब्राह्मण समुदायाबद्दल आवाज उठवत राहिले होते. अशा स्थितीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने ब्राह्मण समुदाय नाराज होण्याची शक्यता आहे. सुल्तनापूरचे आमदार सूर्यभान सिंह यांना तिकीट मिळालेले नाही. माजी मंत्री विनोद सिंह यांना तेथे उतरविण्यात आले आहे.
रामराज वनवासींना संधी
भाजपच्या 8 व्या यादीत चकित करणारे नाव रामराज वनवासी यांचे आहे. गाझीपूर जिल्हय़ातील जखनिया मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाली आहे. रामराज वनवासी हे भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चात कार्यरत आहे. वंचित वर्गासाठी ते 1980 पासून लढा देत आहेत.