प्रतिनिधी/ पणजी
श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱया विद्याधिराज पुरस्कारासाठी 2019 या वर्षाकरीता प्रख्यात चित्रकार पद्मभूषण लक्ष्मण पै यांना जाहीर करण्यात आला आहे.
जीवोत्तम मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी जारी केलेल्या एका पत्रकात नामवंत गोमंतकीय चित्रकार लक्ष्मण पै यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या गुरूपीठारोहणाच्या 47 व्या वर्धापनदिनी गुरुवार दि. 26 मार्च रोजी पर्तगाळी येथे होणाऱया एका विशेष समारंभात स्वामींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. लक्ष्मण पै यांना यापूर्वी भारत सरकारने पद्मभूषण व गोवा सरकारने गोमंत भूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
लक्ष्मण पै यांनी गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सेवा बजावलेली आहे. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने न्यूयॉर्क, पॅरिस, बर्लिन, इत्यादी ठिकाणी भरविण्यात आलेली आहेत. पै यांचे गोवा मुक्तीलढय़ात फार मोठे योगदान आहे. पोर्तुगिजांनी त्यांना तीन वेळा अटक केली होती. गोवा मुक्तीलढय़ात त्यांनी पोर्तुगिजांविरुद्ध सत्याग्रहाद्वारे लढा दिला होता.