ऑनलाईन टीम / कोलकाता :
तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने विरोध केल्यानंतर राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य स्वप्न दासगुप्ता यांनी आज राज्यसभेचा राजीनामा दिला. हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपने त्यांना तिकीट दिले होते. त्यावरून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने आक्षेप घेतला होता. हा वाद वाढत असताना दासगुप्ता यांनी मंगळवारी राज्यसभेचा राजीनामा दिला.
भाजपने पश्चिम बंगालमध्ये रविवारी स्वप्न दासगुप्ता यांच्या नावासह आणखी 26 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने दासगुप्ता यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याचा विशेष प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती.
तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोत्रा यांनी ट्विट करून या मुद्द्यावर निषेध नोंदवला होता.संविधानाच्या दहाव्या अनुसूचीचा स्क्रीनशॉट शेअर करताना मोत्रा यांनी म्हटले होते की, दासगुप्ता यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार राज्यसभेचा नामनिर्देशित सदस्य शपथ घेतल्यानंतर तसेच त्याने सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करून कोणत्या पक्षात प्रवेश केला असेल तर तो राज्यसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरेल.