विधि आणि न्याय विभागाने पाठविला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव : लवकरच निर्णय शक्य
प्रतिनिधी / कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त करण्याच्या हालचाली राज्यस्तरावर सुरू झाल्या आहेत. राज्याच्या विधि व न्याय विभागाने देवस्थान समिती बरखास्त करण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे महेश जाधव आहेत. समिती बरखास्तीनंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
राज्यात 2019 मध्ये सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने भाजपचे नेते, पदाधिकारी असलेली मंडळे, महामंडळे, समित्या बरखास्त करून त्यामध्ये नवीन अध्यक्ष, संचालक, सदस्य निवडण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या महिन्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बरखास्त करण्यात आले. या मंडळाचे अध्यक्ष मराठा आंदोलनात अग्रेसर भाजपचे नेते असणारे नरेंद्र पाटील होते. बरखास्तीनंतर नवीन अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती लवकरच होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्तीच्या हालचाली
करवीर निवासिनी अंबाबाई, वाडी रत्नागिरीचा जोतिबा यासह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथील तब्बल3042 मंदिरांचे नियंत्रण करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीवर सध्या भाजपचे नेते महेश जाधव अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचेही काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने महेश जाधव यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यांनी गेल्या तीन वर्षांत प्रभावी काम केले आहे. पण राज्यात गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर राजकीय समिकरणे बदलली आहेत. त्यानुसार आता देवस्थान समिती बरखास्त करून त्या जागी नवीन अध्यक्ष, पदाधिकारी निवडीच्या हालचाली सुरू आहेत.
विधि व न्याय विभागाचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
देवस्थान समिती बरखास्त करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्याच्या विधि व न्याय विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या प्रस्तावाबाबतचा निर्णय झालेला नाही. तो लवकरच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीकडे साऱयांच्या नजरा आहेत.
पक्षनिहाय अशा होतील देवस्थान समित्यांच्या वाटण्या
राज्यातील मुंबई सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट, शिरर्डीचे साईबाबा मंदिर ट्रस्ट, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांची सूत्रे
देवस्थानवर राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी
महाविकास आघाडीतील सत्तासूत्रानुसार देवस्थान समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष उद्योजक व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने आदींची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
मंदिर समितीवर काँग्रेसचे नेते
राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालिन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबाबाई मंदिर समितीची स्थापना करण्यासंदर्भातील कायदा करण्यात पुढाकार घेतला होता. तो कायदा आणि समिती अद्याप अस्तित्वात आलेली नाही. या समितीवर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना संधी देऊन काँग्रेस, राष्ट्रवादी बॅलन्स साधण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्यासह इतर नावांची चर्चा आहे.