पहिल्याच दिवशी 40 लाखांहून अधिक मुलांना डोस ः नोंदणीकृतांची संख्या 51 लाखांच्या पुढे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात 3 जानेवारीपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू झालेल्या 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्वच राज्यांमध्ये मुलांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते. सोमवारी रात्री 8.30 वाजेपर्यंत 40 लाखांहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. त्यानंतरही हा आकडा पुढे वाढत जात होता. दिवसभरात लाभलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ‘वेल डन यंग इंडिया !’ असे ट्विट करत आनंद व्यक्त केला. दरम्यान, लसीसाठी नोंदणी करणाऱयांची संख्या 51 लाखांच्या पुढे गेली आहे.
देशात कोरोना आणि ओमिक्रॉनचा संसर्ग आणि बाधितांचा आकडा वाढत असतानाच आता लसीकरण आणि नोंदणीची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे. लसीकरणासाठी ठिकठिकाणच्या केंद्रांवर लाभार्थींची गर्दी होताना दिसत आहे. आता मुलांचे लसीकरणही सुरू झाल्याने ऑनलाईन नोंदणी करून मुले स्वतःहून लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. मुलांच्या लसीकरणाच्या नोंदणीचा कार्यक्रम शनिवारपासून सुरू झाला. सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, को-विन ऍपवर आधीच तयार केलेले खाते किंवा नवीन खाते तयार करून नोंदणी केली जाऊ शकते. याशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येते. गेल्या तीन दिवसात सोमवारी रात्रीपर्यंत 15 ते 18 वयोगटातील तब्बल 51 लाख 52 हजार 901 मुलांनी लसीसाठी नोंदणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशाला दिलेल्या संदेशात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. सध्या देशात 15-18 वयोगटातील मुलांची संख्या सुमारे 10 कोटी इतकी आहे. जगातील 30 पेक्षा जास्त देशांमध्ये मुलांना आधीच लसीकरण केले जात आहे. भारताने मुलांच्या मोहिमेसाठी थोडाफार विलंब केला असला तरी संबंधित औषधांच्या चाचण्या पूर्णपणे सकारात्मक असल्याची खात्री करूनच मुलांचे लसीकरण हाती घेण्यात आले आहे.
लस लाभार्थींमध्ये झपाटय़ाने वाढ
सोमवारी दिवसभरात डोस घेणाऱयांचा आकडा 1 कोटींच्या आसपास पोहोचला होता. को-विन ऍपवर रात्री 10 वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार 98 लाख 22 हजार 500 लाभार्थींनी डोस घेतला होता. त्यानंतरही हा आकडा वाढत चालला होता. तसेच आतापर्यंत लस घेणाऱयांचा आकडा 146 कोटी 70 लाख 64 हजार 800 इतका झाला होता.