अपप्रचाराला बळी पडू नका : मंत्री गोविंद गावडे यांचे आवाहन
वार्ताहर /माशेल
रेती व्यवसायावर कायद्याने बंदी असून हा विषय न्याय प्रविष्ठ आहे. प्रियोळचे माजी आमदार दीपक ढवळीकर हे त्यावरुन विनाकारण राजकारण करून स्थानिकांची दिशाभूल करीत आहेत. रेती उपसण्यास बंदी असल्याने सरकारी अधिकाऱयांकडून कारवाई केली जाते. वळवई, सावईवेरे, बेतकी आदी भागात पारंपरित्या हा व्यावसाय करीत आलेल्या नागरिकांना कायम स्वरुपी परवाना मिळावा यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत, असे प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
कुलकर्णीवाडा बेतकी व मानमोळे बेतकी या ठिकाणी संरक्षक भिंतीच्या कामाला प्रारंभ केल्यानंतर प्रसार माध्यमासमोर ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, बेतकीचे सरपंच दिलीप नाईक, पंचसदस्य भावना नाईक, मुक्ता नाईक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
माजी आमदार दीपक ढवळीकर हे प्रियोळ मतदारसंघातील अनुसूचित जाती जमातीच्या 18 कुटुंबांना घरे बांधून देत असल्याचा दावा केला आहे. ढवळीकर ही घरे कुठल्या वाडय़ावर बांधत आहेत याची त्यांनी यादी द्यावी. अनुसूचित जाती जमाती महामंडळातर्फे घर दुरुस्ती व घर बांधणीसाठी असलेल्या योजनेतून त्यांना आर्थिक मदत केली जाईल, असेही गोविंद गावडे यांनी सांगितले. एसटी बांधवांना स्वाभिमानाने जगता यावे, त्यांचा शैक्षणिक व सामाजिक विकास व्हावा यासाठी सरकारकडून त्यांच्यासाठी या योजना राबविलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षांत शैक्षणिक शुल्क भरायचे असल्यास त्यांना आदिवासी निधीतून त्वरित रु. 1 लाख पर्यंत अर्थसाहाय्य केले जाईल. उटा संस्थेतर्फे गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बेतकी भागात संरक्षक भिंती बांधण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. त्यानुसार रु. 93 लाख खर्चून त्या बांधण्यात येत आहेत. सरपंच दिलीप नाईक म्हणाले, प्रियोळात सध्या विकासकामांची लाट आली असून ज्या लोकांना हे पाहवत नाही, तेच येथील जनतेची दिशाभूल करीत आहेत. नागरिकांनी या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.