ऑनलाइन टीम / पिंपरी :
पिंपरी-चिंचवडमधून मेट्रो सुसाट निघाली असून, शहरातील 7.20 किलोमीटर अंतराच्या प्राधान्य मार्गावर सुमारे 75 टक्के काम झाले असल्याचा दावा मेट्रोने केला आहे. येत्या तीन महिन्यात प्रवासी तिकीट काढून पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रोचा प्रवास करतील, तर येत्या काळात दापोडीपासून पुण्याला जोडणाऱया मेट्रो मार्गांचे काम लवकर पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याचे सांगण्यात आले.
पुणे व पिंपरी ही जुळी शहरे मानली जातात. गेल्या काही दशकात पिंपरी-चिंचवडचेही वेगाने नागरीकरण झाले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 17.27 लाखापर्यंत असलेली लोकसंख्या 2017 पर्यंत 21 लाखांवर गेली आहे 2028 व 2038 ही लोकसंख्या अनुक्रमे 30.9 लाख आणि 39.1 लाख होण्याचा अंदाज आहे. या वाढत्या नागरीकरणासाठी सक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज असल्याची मागणी होत होती. त्यामुळे मेट्रोला नागिरकांची पसंती मिळाली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट हा 16.59 किमी लांबीचा (मार्ग 1) व पिंपरीपासून रेंज हिल्सपर्यंत व तिथून स्वारगटेपर्यंतचा 14.66 किमी अंतराचा (मार्ग 2) रस्ता भूमिगत मार्गाने निवडण्यात आला. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्गिका 1 व 2 चे भूमिपूजन रेंजहिल्स, खडकी येथील सिंचन मैदान येथे झाले. पहिल्या कॉरिडॉरमध्ये पीसीएमसी ते स्वारगेट या दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. यामध्ये पिंपरी ते रेंजहिल्स हा प्राधान्य मार्ग (प्रायोरिटी रूट) म्हणून निवडण्यात आला आहे. या दोन मार्गिकांसाठी 11,522 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका 10 टक्के, केंद्र व राज्य शासन प्रत्येकी 20 टक्के निधी तर 50 टक्के निधी हा कर्जाद्वारे उभारण्यात येणार आहे. यात राज्य शासनाच्या 20 टक्के वाटय़ात भूसंपादनाचा समावेश आहे.
या मार्गावर पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील ग्रेडसेपरेटरच्या एक्स्प्रेस मार्गावर मेट्रोचे पिलर उभारणीचे काम दिवसरात्र सुरू आहे. पिंपरी ते रेंजहिल्स मार्गावर प्रत्येकी 30 मीटरवर एक असे एकूण 288 पिलर उभारले जाणार आहेत. त्यातील एकूण 182 पिलर उद्योगनगरीत उभे राहिले आहेत. सध्या या मागार्वर मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे. येत्या 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत मेट्रोच्या मार्गिकेची उर्वरित कामे आणि प्राधान्य मार्गावरील स्टेशनचे बांधकाम पूर्ण केले जाणार असून, याच कालावधीत स्टेशनवरील तिकीट खिडकी, लिफ्ट-सरकते जिने अशा सर्व कामांची पूर्तता केली जाणार आहे. हे करताना दिव्यांग प्रवाशांसाठी व्हिलचेअर, गाईड यांचीही सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पिंपरीत मेट्रोचे सहय़ोग केंद्र
मेट्रोची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून मेट्रोची माहिती देणारे सहयोग केंद्र पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर एसटी आगारात सुरू करण्यात आले आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक संथ झाली आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी 4 प्रशिक्षित जवानांचे शीघ्र कृती दलाचे पथक तैनात केले आहे; तसेच वाहतूक नियंत्रणासाठी 16 ट्रफिक मार्शल हातात लाल झेंडा घेऊन कार्यरत आहेत.
मेट्रो स्टेशनलगत बाईक शेअरिंग व ई रिक्षा : दीक्षित
महामेट्रोद्वारे प्रवाश्यांना सार्वजनिक वाहतुकीचा चांगल्या प्रकारे लाभ घेता यावा, यासाठी मेट्रो स्टेशनलगत बाईक शेअरिंग व ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. मेट्रो स्टेशनपासून अंतर्गत मार्गांवर या सोयी महापालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उपलब्ध होतील. याबाबतचा प्रस्ताव महापालिकांसमोर ठेवणार असल्याचेही दीक्षित यांनी स्पष्ट केले.
दृष्टीक्षेपात मेट्रो
-पिंपरीत मेट्रोला वीजपुरवठा करण्यासाठी टॅक्शन पॉवर सबस्टेशन
-शहरातील वर्तुळाकार मार्गावरे मेट्रो निओचा विचार
-निगडी, चाकणपर्यंत मेट्रो प्रस्तावित
-प्रत्येक स्टेशन व जवळच्या भागात पार्किंग देणार
-पाच लाख प्रवासी वर्षभरात प्रवास करतील, असा अंदाज
-प्रवाशांचा अंदाज घेऊन कोच वाढविणार