जनतेने काळजी घेण्याचे आवाहन : दुसरे कोविड हॉस्पिटल फोंडय़ात : आरोग्यमंत्र्यांकडून दिवसभर मॅरेथॉन बैठका
प्रतिनिधी / पणजी
राज्यात काल रविवारी कोरोनाचा उद्रेक झाला असून एकाच दिवशी तब्बल 506 नवे कोरोनाबाधित सापडल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल मॅरेथॉन बैठका घेतल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत बैठक झाली. त्याचबरोबर राज्यातील खासगी डॉक्टर्ससोबतही बैठक घेण्यात आली. पुढील 60 दिवस काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालय हे दुसरे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे.
काल अचानकपणे कोरोनाबाबत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी पाचशेचा आकडा पार केल्याने सरकार हादरले. आरोग्यमंत्र्यांनी तडकाफडकी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी फोंडा उपजिल्हा रुग्णालय दुसरे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या उपाययोजना सरकार करीत आहे. ज्या गोष्टींची कमतरता आहे त्याची काळजी घेतली जात आहे. आवश्यक त्या मशिन उपलब्ध केल्या जात आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी यांनी यावेळी सांगितले.
दुपारपासून मॅरेथॉन बैठका
पहिली बैठक मुख्यमंत्री व अंतर्गत टीम यांच्यासमावेत झाली. दुसरी बैठक जे तज्ञ याकामी मदत करतात त्यांच्यासोबत घेण्यात आली. डॉ. ऑस्कर रिबेलो, डॉ. मारीओ, डॉ. पेडणेकर, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. विरेंद्र गावकर, डॉ. राजेश्वर नाईक, आरोग्य खात्याच्या सचिव नीला मोहनन यांची या बैठकीत उपस्थिती होती. यावेळी नियमावलीबाबत व अन्य उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. ज्या सूचना केल्या त्याची नोंद घेण्यात आली आहे. दर आठवडय़ात या
तज्ञांसोबत बैठक घेतली जाणार आहे.
प्लाझ्मा दानासाठी पुढे या : आरोग्यमंत्री
प्लाझ्मा दान करण्यासाठी 39 पेक्षा जास्त कोरोनामुक्त रुग्णांनी तयारी दर्शविली आहे. अजूनही प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे. कोरोनामधून मुक्त झालेल्यांनी पुढे यावे व प्लाझ्मा दान करावे. जेणेकरून त्याचा उपयोग अन्य रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी करणे शक्य होणार आहे. प्लाझ्मा दान केले म्हणून कोणतेही नुकसान होणार नाही. आवश्यक तोच प्लाझ्मा शरीरातून घेतला जाणार आहे. त्यामुळे आरोग्याला कोणताही अपाय होणार नाही, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री, आरोग्य खात्याच्या संचालक, डॉक्टरांची टीम गोमेकॉत आवश्यक ती काळजी घेत आहे. चांगल्या सुविधा, चांगले जेवण दिले जात आहे. आतापर्यंत सात रुग्णांना प्लाझ्मा दिलेला आहे. त्यांची स्थिती सुधारत आहे.
आता दोन कोविड रुग्णालये
राज्यात आता दोन कोविड रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असतील. एक मडगावातील ईएसआय रुग्णालय व दुसरे फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालय. पुढील 48 तासात दुसरे रुग्णालय तयार होईल. जुने हॉस्पिसियोतील रुग्णानांही नवीन दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हलविले जाणार आहे. हॉस्पिसियो येथेही कोरोनाच्या उपचारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील. त्यामुळे तीन रुग्णालये उपलब्ध असतील.
पुढील 60 दिवस काळजी घ्यावी
लोकांनी गरज भासली तरच रुग्णालयात यावे, असे आवाहनही मंत्री राणे यांनी केले. पुढील 60 दिवस काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहे त्यामुळे अत्यंत आवश्यक असेल तरच रुग्णालयात यावे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आवश्यक ती औषधे उपलब्ध केली जात आहेत. आता कोविड केंद्रातही आवश्यक सुविधा पुरविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
रविवारी सर्वाधिक कोरोना रुग्ण
राज्यात रविवारी कोरोननाचा उद्रेक होऊन सर्वाधिक 506 रुग्ण सापडल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. यानंतर गोमेकॉसह जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची ऍन्टीजॅन चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांची स्थिती समजण्यास मदत होणार आहे. ऍन्टीजॅन चाचणी आता सर्वच ठिकाणी सुरू केली जाणार आहे. गोमेकॉमध्ये कोरोना रुग्णांसाठी वेगळा एक वॉर्ड तयार केला जाणार आहे.
प्रसारमाध्यमानीही लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. खासगी डॉक्टरांनीही मदतीची तयारी दर्शविली आहे. लोकांनी आता गरज असेल तरच बाहेर पडावे. सामाजिक अंतर पाळावे. पुढील 60 दिवस काटेकोरपणे काळजी घेण्याची गरज आहे. आज कठीण स्थिती आहे. त्यामुळे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
राज्यात 23 डॉक्टर, 18 नर्स पॉझिटिव्ह
राज्यात 23 डॉक्टर व 18 नर्स कोरोना पॉझिटिव्ह आले हेते. त्यापैकी 12 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीचे प्रमाण चांगले आहे, असेही मंत्री राणे म्हणाले. यावेळी गोमॅकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व आरोग्य संचालिका नीला मोहनन यांची उपस्थिती होती.