- ‘अटल’ बस सेवेचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
ऑनलाईन टीम / पुणे :
‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ‘अटल’ बस सेवेला आज सुरुवात झाली. या अंतर्गत पुणेकरांना पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास अवघ्या 5 रुपयांत करता येणार आहे. दर पाच मिनिटाला ही सेवा उपलब्ध असेल.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पीएमपीचे सीएमडी राजेंद्र जगताप, आयुक्त विक्रमकुमार उपस्थित होते.
‘रस्त्यावरच ट्रॅफिक कमी करायचे असेल तर चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा देणे आवश्यक आहे. याने वेळ आणि पैसे वाचत असतील तर लोक नक्की या सुविधेचा वापर करतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, या योजनेअंतर्गत पीएमपीएमएलने पुणे शहरातील गर्दीच्या व अरूंद 9 मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी 97 बसेसचे संचलनाचे नियोजन केले आहे. यामध्ये पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, महापालिका भवन आणि पूलगेट अशा शहराच्या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.
तसेच डेपो अंतर्गत टर्मिनल एकुण 53 मार्गावर 143 बसेसचे संचलनाचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना 5 रू. दरात 5 कि.मी. अंतराचा सुखकर प्रवास करता येईल. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी दर 5 मिनीटांनी बसेस उपलब्ध असतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर महापालिका भवनातून अटल सेवेचा बस मार्गस्थ करण्यात आल्या. पीएमपी अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी यावेळी अटल योजनेच्या बसने प्रवास केला.