ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात कोरोनामुळे मागील काही तासात 3 जणांचा तर पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबळींची संख्या 62 वर तर पिंपरी-चिंचवडमधील मृतांची संख्या 3 वर पोहचली आहे.
शिक्रापूर येथील 40 वर्षीय कोरोनाग्रस्ताचा गुरुवारी रात्री ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्याला खोकला, श्वसन विकार, न्यूमोनिया, किडनीचे आजार होते. 20 दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. तर कॅम्प परिसरातील 32 वर्षीय शिक्षिकेला काल केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेव्हा तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिची कोरोना चाचणी केला असता आज तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. पर्वतीदर्शन भागातील 61 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा काल रात्री उशीरा कोरोनामुळे ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना 19 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खोकला, श्वसनाचा विकार, लठ्ठपणा आणि रक्तदाब या विकारांनी ही महिला ग्रासलेली होती.
पिंपरी-चिंचवडमध्ये आज एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 12 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या आता 69 वर पोहोचली आहे.