काही कंपन्यांची विक्री प्रभावीत तर काहींना नफा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहन कंपन्यांनी मार्च महिन्यातील वाहन विक्रीचे आकडे सादर करण्यास सुरुवात केली आहे. वर्षाच्या आधारे तुलना केल्यास मार्च 2022 मध्ये विक्रीत घसरण राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. जास्तीत जास्त कंपन्यांची पुरवठा साखळी प्रभावीत होत गेली आणि सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे वाहन कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
वाहन क्षेत्रातील निवडक कंपन्यांची विक्रीसंबंधीची स्थिती खालील प्रमाणे-
एमजी वार्षिक विक्री प्रभावीत ः एमजी मोटार इंडियाची विक्री मार्च महिन्यात वर्षाच्या आधारे 14.5 टक्क्यांनी घसरली आहे. यावेळी कंपनीने म्हटले आहे, की पुरवठा साखळी प्रभावीत झाल्यामुळे विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे.
एस्कॉर्टची वार्षिक विक्री 45.6 टक्क्यांनी घसरली ः एस्कॉर्ट लिमिटेड ट्रक्टरची विक्री वर्षाच्या आधारे 45.6टक्क्यांनी घसरली आहे. कंपनीने मागील महिन्यात देशातील बाजारात 9,483 आणि देशाबाहेर 591 युनिट विक्री केली आहे. महिन्याच्या आधारे मात्र 61 टक्क्यांची वाढ राहिली आहे.
व्हीइसीव्हीची विक्री 25 टक्क्यांनी वधारली ःमागील महिन्यात वोल्वो आयशरच्या व्यावसायिक वाहनांची विक्री मजबूत राहिली असल्याचे दिसून आले. कंपनीने 25.1 टक्क्यांची वार्षिक वाढ प्राप्त करत 8,803 युनिटची विक्री मार्च महिन्यात केली आहे. कंपनीने मागील वर्षातील मार्चमध्ये 7,037 इतकी वाहन विक्री केली होती.
मारुतीची मार्चमधील विक्री ः मारुती सुझुकी कंपनीने मार्च महिन्यात 1,70,395 इतकी वाहन विक्री करत दोन टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. हा आकडा मार्च 2021 मध्ये 1,67,014 इतका होता.