ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. दरम्यान, या भागात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू आहे.
पुलवामाच्या त्रालमधील नागबेरान तारसरच्या जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले, परंतु दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली नाही. दहशतवाद्यांनी स्वत:ला घेरलेले पाहून सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. सुरक्षा दल सध्या या भागात शोध मोहीम राबवत आहेत.