वार्ताहर/ पुसेगांव
जागतिक कोरोना युध्दात जग भरडले जात असताना या परिस्थीतीचा फायदा आता व्यापारीवर्गातून उठविला जात आहे. पुसेगांव व परिसरातील ग्राहकांची मोठी बाजारपेठ असलेल्या पुसेगांव पेठेतून आता व्यापारी वर्गाने वाहत्या गंगंत हात धूवून घेण्यास सुरुवात केल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की गेले दिड-दोन महिने लॉकडाऊन आहे. लोकांची जगण्यासाठी धडपड सुरु आहे. मागील आठवडय़ापासून शासनाने लॉकडाऊनमध्ये व विशेषतः ग्रीन झोनमध्ये काही अटींवर व्यापारपेठ खुली करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे लोकांची गर्दी उसळून मिळेल त्या किमतीत आवश्यक सुविधा खरेदी केल्या जात आहे. मात्र नेमकी हीच संधी साधून काही व्यापारी चढेल भावाने वस्तू विक्री करीत आहेत. येथील लोखंड व्यापाऱयांनी तर काटामारीची नामी संधी शोधल्याचे लोक सांगत आहेत.
दोन महिण्यापूर्वी लोखंडाचा भाव जो होता. त्याच्या दुप्पटीने सध्या विक्री सुरु असल्याचे ग्राहक सांगत आहेत.
मागील महिण्यात वडून तहसिलदारांनी अशाच एका संधीसाधू किराणा दुकानदारावर कारवाई करुन सदर दुकान सील केले होते. याशिवाय येथील ग्रामपंचायत प्रशासनाने व्यापारी संघटनेची मिटींग घेवून योग्य भावात ग्राहकांना माल देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. खरं तर सदर लोखंड स्टील दुकानदार परप्रांतीय आहेत. पुसेगांव बाजारपेठ ही शेतकऱयांची तसेच दुष्काळी लोकांची पेठ म्हणून ओळखली जाते. येथील लोकांच्या चरितार्थ शेतीवर अवलंबून असल्याने येथे आर्थिकदृष्टय़ा मागासलेपणा आहे. अशावेळी व्यापाऱयांनी लोकांना सहकार्य करुन तसेच योग्य तो नफा देवून व्यापार करणे गरजेचे आहे. मात्र गरीब ग्राहकांच्या टाळुवरिल लोणी खाण्याची सवय झालेल्या व्यापाऱयांना करोना ही एक आणखी संधी मिळाल्यासारखे वाटते. तरी संबंधित व्यापाऱयांनी योग्य तो व्यवहार करुन ग्राहकांचे हित जोपासावे अन्यथा पुसेगांव व्यापारपेठेतील अशा परप्रांतीय व्यापाऱयांना आपापल्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. अशा सज्जड इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. संबंधित प्रशासकीय अधिकाऱयांनी नफाखोरी करणाऱया व्यापाऱयांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणीदेखील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्यावतीने आगामी काळात ग्रामसभा घेवून परप्रांतीय व्यापाऱयांबाबत विशिष्ठ धोरण अवलंबिले जाणार असल्याचेही सांगितले आहे.