पेठ वडगाव/प्रतिनिधी
पेठ वडगाव शहरात आज सहा कोरोनाबाधीतांची भर पडली आहे. शहरात कोरोनाबाधीतांचा आकडा आज ५१ वर पोहोचला आहे. शहरात भाजी विक्रेते व फळ विक्रेते कोरोना बाधित होत आहेत. हे भाजी पाला विक्रेते वडगाव बाजार समितीमध्ये असलेले भाजी पाला सौद्याच्या ठिकाणी सोशल डीस्टन्स पाळला जात नाही यामुळे काही दिवस हा भाजीपाला सौदा बंद करण्याची मागणी नागरीकातून होत आहे. तर भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांनी आता खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
पेठ वडगाव शहरात आठवडाभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात आज सहा कोरोनाबाधीतांची भर पडली आहे. शहरात तीन भाजीपाला विक्रेते तर एक फळ विक्रेती महिला तसेच बाजार समितीमध्ये भाजीपाला गाडीमध्ये भरण्याचे काम करणारा युवक कोरोनाबाधित झाला आहे. वडगाव बाजार समितीत भरत असलेल्या भाजीपाला सौद्याच्या ठिकाणी कोणताही सोशल डीस्टन्स पाळला जात नाही. शहरात विविध कारणामुळे वाढत चाललेला कोरोना रुग्णामध्ये बाजार समितीच्या ठिकाणापासूनही कोरोना संसर्ग वाढत चालला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वडगाव बाजार समितीत भरत असलेला जनावरांचा बाजार, भाजीपाला सौदा या परिसरातील रहिवासी असलेल्या नागरिकांना धोकादायक असल्याबाबत नगरसेवक संतोष चव्हाण व नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्यात पालिका सर्वसाधारण सभेत खडाजंगी झाली होती. या भाजीपाला विक्री व जनावरांच्या बाजारास विरोध असूनही या ठिकाणी भरत असलेल्या जनावराच्या बाजारास व भाजीपाला सौद्या भरण्याबाबत काहीजणांनी समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
सध्या बाजार समितीत भरणारा जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. मात्र भाजीपाला सौदा सुरु आहे. या ठिकाणी कोरोना संसर्ग होवू नये यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून कोणतीही दक्षता घेतली जात नाही अनेकजण विनामास्क भाजीपाला खरेदी करत असतात. येथे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह विविध भागातून भाजीपाला विक्रीसाठी येत असतात. यामुळे येथे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन याचा संसर्ग शहरात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी जात असलेले वडगाव शहरातील भाजीपाला विक्रेते व भाजीपाला गाडीत भरण्याचे काम करत असलेला तरुण कोरोनाबाधित झाला आहे. या ठिकाणी असुरक्षितरित्या भरत असलेला होलसेल भाजीपाला बाजारात कोरोणाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणी भरणारा भाजीपाला सौदा काही दिवस बंद ठेवण्याची मागणी या परिसरातील नागरीकातून होत आहे. दरम्यान आज एक फळ विक्रेती महिलाही कोरोनाबाधित झाल्याने फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.