प्रतिनिधी / पेठ वडगाव
येथील माजी नगराध्यक्ष विश्रांत बाळू माने (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि.२ रोजी पेठ वडगाव येथे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनानुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नातेवाईकांनी अंत्यसंस्कार आटोपले.
गेल्या काही वर्षापासून तब्येतीची तक्रार असलेले माजी नगराध्यक्ष विश्रांत माने यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरु होते. आज माने यांच्या निधनानंतर त्यांच्या जनसंपर्क व जनसामान्यात मिसळून करत असलेल्या कामामुळे तसेच गोरगरीबांना आधार देवून त्यांना विविध पातळीवर मदत करत असल्यामुळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी दक्षता घेत नातेवाईकांना व सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्यांना गर्दी न होऊ देण्याबाबत सूचना दिल्या.
त्यांच्या निधनानंतर कोरोनापासून बचावासाठी गर्दी होऊ नये म्हणून माजी नगरसेवक आर.डी.पाटील, युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष शरद पाटील, नगरसेवक अजय थोरात, संतोष गाताडे, संदीप पाटील, संतोष चव्हाण, शिवसेनेचे उपशहरप्रमुख अंकुश माने, सुनिल माने यांनी नागरिकांना गर्दी करण्यापासून रोखले व काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी आटोपून घेवून नातेवाईक, विश्रांत मानेदादा प्रेमी ग्रुप व शहरातील नागरिकांनीही पालिका व पोलीस प्रशासनास सहकार्य केले. विश्रांत माने यांच्या निधनाने वडगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.