प्रतिनिधी / बेळगाव
पोलीस अधिकाऱयांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका रुग्णाला वेळेवर रक्त मिळू शकले. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी पोलीस अधिकाऱयांच्या बरोबरच रक्तदात्यांनाही धन्यवाद दिले आहेत.
रायचूरच्या हुट्टी गोल्ड माईन्स येथील बसण्णा विरापण्णा या रुग्णावर येथील केएलई हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच बाटल्या रक्ताची गरज होती. सदर रुग्णाला रक्त देण्यासाठी फेसबुक प्रेंड्स सर्कलचे कार्यकर्ते रक्तदाता किशोर कुमार प्रभू यांना घेऊन जात होते. परंतु कोणतेही वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. मुसळधार पाऊस सुरू झाल्याने वाहन मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे फेसबुक प्रेंड्सचे संतोष दरेकर यांनी पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांना फोन करून वाहनासाठी मदत मागितली. त्यांनी त्वरित वाहतूक पोलिसांचे वाहन देऊन रक्तदात्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले.
यामुळे किशोर हे वेळीच रक्तदान करू शकले आणि रुग्णाला त्याची मदत होऊ शकली. याबद्दल फेसबुक प्रेंड्सने डॉ. विक्रम आमटे, व्ही. बी. दळवाई व एम. बी. वाणी यांना धन्यवाद दिले.
याचबरोबर केएलईमधील श्रीनिवास होन्नावरकर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांना ए-पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती. फेसबुक प्रेंड्सने त्यांच्यासाठी 2 बाटल्या रक्त उपलब्ध करून दिले.