प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांअंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये सी. पी. आर. रुग्णालय कोल्हापूर व खाजगी स्वयंसेवी संस्था मार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतात. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे या शस्त्रक्रिया बंद असल्यामुळे जिह्यात सुमारे 6 हजार शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती वंदना जाधव यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. यावेळी प्रलंबित शस्त्रक्रिया तत्काळ मार्गी लावण्यासाठी आरोग्य विभागाने परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश सभापती जाधव यांनी दिले.
डोळ्यास मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना दैनंदिन अडचणीना सामोरे जावे लागते. अनेक अडचणींमुळे मोतिबिंदू रुग्णांचे जीवन प्रभावीत होत आहे. त्यामुळे रखडलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्य सभापती जाधव यांनी आपल्या दालनात बैठक घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख, लायन, रोटरी, नॅब या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, सी. पी. आर. नेत्ररोग तज्ञ डॉ. सुजाता वैराट आदी उपस्थित होते.
सी.पी.आर. रुग्णालयात दैनंदिन साधारण 15 मोतिबिंदू शस्त्रक्रिया होतात. त्यामुळे तेथे वार्षिक जास्तीत जास्त एक हजार इतक्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया होतात. तसेच शासनाकडून खाजगी स्वयंसेवी संस्थाना दिले जाणारे 2 हजार रूपयांचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे या शस्त्रक्रिया मोठया प्रमाणात प्रलंबित असून त्यामुळे वृध्द रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या शस्त्रक्रिया पूर्ववत सुरु करण्यासाठी खाजगी स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन घेण्यासाठी त्यांना देण्यात येणारे अनुदान पूर्ववत चालू करण्यासाठी आरोग्य सेवा संचालकांना पत्र लिहण्याच्या सूचना सभापती जाधव यांनी दिल्या. तसेच ज्या स्वयंसेवी संस्था मोफत अथवा अत्यल्प दरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यास तयार आहेत, त्यांनी याबाबतचे लेखी पत्र जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्याच्या सूचना सभापती जाधव यांनी दिल्या.
रुग्णांच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी सी. एस. आर. मधून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले. निवडलेल्या लाभार्थ्यांची रक्त लघवी तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर करावी, तसेच वैद्यकीय अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी रुग्णांची तपासणी करुन शस्त्रक्रियेसाठी योग्य असलेल्या मोतिबिंदू रुग्णांस सी. पी. आर. रुग्णांलयात संदर्भीत करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी केले. डॉ. साळे यांनी आभार मानले.